करवीर निवासिनी श्री अंबाबाई भाविकांतून समाधान

कोरोना लॉकडाउननंतर आता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (temple) भाविकांना मनासारखे दर्शन मिळू लागले आहे. मंदिर आणि परिसरातील एकूणच वातावरण पूर्वपदावर आले असून, आज अनेकांनी मंदिराच्या आवारात विसाव्याचे क्षणही अनुभवले. दरम्यान, ई-पासचा निर्णय रद्द आणि त्याचबरोबर महाद्वार खुले झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील अनेकांच्या दिवसाची सुरुवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊनच होते. नोकरदार असो किंवा व्यावसायिक आपापल्या कामावर जाण्यापूर्वी ही मंडळी दर्शनासाठी आवर्जून येतात. शहरातील जुन्या पेठांतील अनेक गृहिणी महिला दुपारी दर्शनासाठी येतात, तर अनेक ज्येष्ठ मंडळी सायंकाळनंतर देवीच्या दर्शनासाठी येऊन काही काळ मंदिराच्या आवारात विसावा घेतात.

प्रत्येकाच्या रोजच्या वेळापत्रकातील मंदिरात येण्याच्या ठरलेल्या वेळा वेगवेगळ्या. मात्र, ई-पास आणि महाद्वार बंद असल्याने त्यांच्यावर मर्यादा आल्या होत्या. काल रात्रीपासून महाद्वार खुले झाल्यानंतर या मंडळींनी आजपासून पुन्हा मंदिरात हजेरी लावली. दरम्यान, महाद्वारासमोरील दुकानदार, विक्रेत्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपासून दुकाने बंद ठेवावी लागली. त्यामुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. एकूणच सारी आर्थिक घडी विस्कटली. आता महाद्वार खुले झाल्याने ग्राहकांची संख्याही वाढली असून, आमची आर्थिक स्थिती आता हळूहळू सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

– शिरीष काटवे, दुकानदार

कोरोना काळात नियमांचे पालन बंधनकारक होते; पण मंदिरे पूर्ण क्षमतेने खुली होऊनही अंबाबाई मंदिराचे (temple) महाद्वार खुले नव्हते आणि ई-पास बंधनकारक होता. त्यामुळे दर्शनावर मर्यादा आल्या होत्या. आता पूर्वीसारखे मनासारखे दर्शन घेता येणार आहे.

– पल्लवी पोतदार, भाविक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *