सौर किरणांमुळे वातावरणातील बदल, घडामोडींचा होणार अभ्यास

वैश्‍विक व सौर किरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणार्‍या बदलांचा व घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये करणे शक्य होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे (Classical equipment) पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रात बसविण्यात येणार आहेत. अहमदाबाद व हैदराबादनंतर अशी सुविधा असणारे कोल्हापूर देशातील तिसरे केंद्र आहे, ही माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागांतर्गत येणार्‍या भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद व शिवाजी विद्यापीठ यांच्यात 2021 ला वातावरणातील मध्यांबर (मेसोस्फियर) – दलांबर (आयनोस्फियर) – ऊष्मांबर (थर्मोस्फियर) या जमिनीपासून 50 कि. मी. ते 500 कि. मी. अंतरामध्ये उत्सर्जित होणार्‍या एकाधिक तरंग लांबीच्या प्रकाश किरणांच्या अभ्यासासाठी सामंजस्य करार झाला. सामंजस्य करारांतर्गत भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद यांच्याकडून 1 कोटी रुपयांची उपकरणे पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसवण्यात येणार आहेत.

ही उपकरणे (Classical equipment) बसविण्यासाठी लागणार्‍या वेधशाळेच्या निर्मितीसाठी विद्यापीठाकडून 22 लाखांची तरतूद केली आहे. उपकरणांमध्ये सीसीडी-आधारित मल्टीवेव्हलेंथ एअरग्लो फोटोमीटर व पीआरएल- एअरग्लो इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. देशातील तिन्ही केंद्रांद्वारे एकत्रितरित्या संशोधन करून वैश्‍विक व सौर किरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांतील घडामोडी व बदलांचा अभ्यास करता येणार आहे. यामुळे विद्यापीठात अवकाश संशोधनासाठी लागणार्‍या मूलभूत संशोधन सुविधेमध्ये वाढ होणार असून संशोधक विद्यार्थ्यांना उपयोेग होणार आहे. पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. राजीव व्हटकर या संदर्भातील कार्यवाही करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *