कोल्हापूर : …….याचा परिणाम शेती अन् शेतकर्‍यांवर

महावितरण कंपनीने कोळशाची कमतरता व वीज निर्मितीमधील तुटवडा याचे कारण पुढे करत फक्त कृषी पंपांच्या वीज पुरवठ्यामध्ये कपात केली आहे. कृषी पंपांना आठवड्यातून दोन दिवस दिवसा 8 तास व पाच दिवस रात्री 8 तास वीज पुरवठा सुरू आहे. रात्रीच्या वीज पुरवठ्याचा परिणाम शेती अन् शेतकर्‍यांवर (farmer) होत आहे. उभी पिके वाळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांच्या जीवालाही वन्य प्राण्यांपासून धोका आहे. गेल्या महिनाभरात रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती

रात्री शेतीला पाणी देत असताना जंगली श्वापदांची भीती असतेच. शिवाय शेतकरी रात्रीच्या वेळी पिकाला व्यवस्थित पाणी पुरवठा झाला आहे का, हे पाहू शकत नाही. यामुळे अनेकदा पाणी वाया जाते. जादा पाणी उपसा झाल्यामुळे वीजही वाया जाते. जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांतील शेत जमिनी या डोंगर परिसराला लागून आहेत. उन्हाळ्यात गवे, रानडुक्कर, अस्वल यांच्याकडून हल्ला होण्याची भीती असते. आजरा व चंदगड परिसरात रात्री हत्तीचा वावर असतो. रात्री पिकाला पाणी देत असताना हे प्राणी शेतकर्‍यांवर हल्ला करतात. यातून अनेक शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रात्री शेतीला पाणी देणे अयोग्यच आहे.

दिवसा वीज मिळाल्यास शेतकरी पिकाच्या वाढीनुसार योग्य प्रमाणात पाणी देऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर होतो. शिवाय दिवसा जंगली श्वापदांचा धोकाही कमी असतो. त्यामुळे दिवसा शेतीला पाणी देण्याचे फायदे आहेत. जिल्ह्यात 1 लाख 46 कृषी पंपधारक आहेत. यातील 20 टक्के कृषी पंपधारकांनी ऑटो स्वीच बसवले आहेत. पण महापूर, अतिवृष्टीमुळे या यंत्रांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना विजेशिवाय पर्याय राहिलेला नाही.

जिल्ह्यात 2 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस, भाजीपाला, गहू, ज्वारी या पिकाखाली असते. या पिकांना उन्हाळ्यात तीन महिने आठ दिवसाला पाण्याचा फेर द्यावा लागतो, अन्यथा ही पिके सुकतात. पण कृषी पंप कमी आणि क्षेत्र जास्त अशी सध्या जिल्ह्यातील परिस्िथती आहे, त्यात याच कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा केला जाणार आहे. यामुळे तर पिकाच्या वाढीबरोबर उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

10 ते 15 टक्के कृषी पंपांना सेन्सर

शेतात रात्रीच्या वेळी पाणी देत असताना सापांसह अन्य जंगली प्राण्यांपासून होणारा धोका ओळखून जिल्ह्यातील 10 ते 15 टक्के शेतकर्‍यांनी कृषी पंपांना सेन्सर बसवून घेतले आहेत. त्याचे कनेक्शन मोबाईलला जोडून त्यावर जमिनीच्या क्षेत्रानुसार ते क्षेत्र किती वेळेत भिजणार याचा अंदाज घेऊन वेळ निश्िचत केली आहे. त्यानुसार मोटर बंद होण्याची यंत्रणाही कार्यान्िवत करण्यात आली आहे. त्याचा चांगला उपयोग शेतकर्‍यांना (farmer) होत आहे.

अन्य पिकांचे उत्पादन घेणे अडचणीचे

महापूर, अवकाळी पाऊस अशा वारंवार येणार्‍या संकटामुळे शेतकरी फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. यातून मार्ग काढत शेतकर्‍यांची वाटचाल सुरू आहे. यामध्ये आधार मिळावा, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. त्यासाठी दिवस वीजपुरवठा झाला असता तर शेतकर्‍यांना उसाबरोबर अन्य पिकांचे उत्पादन घेणे शक्य होते. पण पिकाला रात्रीचे पाणी मिळणार असल्याने शेतकर्‍यांना भाजीपाल्याची पिके घेणे अडचणीचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *