बेळगाव, हुबळी गेले पुढे; कोल्हापूर पडले मागे

प्रचंड संधी असताना गेल्या 83 वर्षांनंतरही कोल्हापूरची विमानसेवा (airlines) विस्तारण्याऐवजी घटत चालली आहे. राज्यातील आणि केंद्रातील लोकप्रतिनिधी आणखी किती दिवस बघ्याचीच भूमिका घेणार, विमानसेवा विस्तारणार तरी कधी, असा सवाल कोल्हापूरवासीय करत आहेत.

5 जानेवारी 1939 साली छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर विमानतळाचे उद्घाटन केले होते. केवळ उद्घाटनच नव्हे तर 6 जानेवारी 1939 रोजी याच विमानतळावरून कोल्हापूर-पुणे-मुंबई अशी प्रवासी विमानसेवाही सुरू केली होती. या घटनेला आता तब्बल 83 वर्षे उलटली आहेत. या प्रदीर्घ कालखंडात कोल्हापूर विमानतळाचा विकास वेगाने व्हायला हवा होता; पण जे होते, तेच सुरू आहे. त्यातूनच विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाल्यानंतर विस्तारीकरणासाठी 274 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याची कामेही सुरू झाली. मात्र, ती संथगतीने सुरू आहेत.

यापूर्वी 1987 पासून 2013 पर्यंत राज्य शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे कोल्हापूरचे विमानतळ होते. या कालावधीत कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू झाली. प्रचंड मागणी आणि प्रतिसाद असतानाही ही सेवा नियमित झाली नाही. केंद्र शासनाने ‘उडान’ योजना सुरू केल्यानंतर कोल्हापूर विमानतळाला पुन्हा एकदा विकासाची संधी मिळाली आहे.

सेवा वाढण्याऐवजी होत आहेत बंद

कोल्हापूर शहर मुंबई, हैदराबाद, बंगळूर, तिरुपती आणि अहमदाबाद या शहरांशी जोडले गेले होते. प्रथम मुंबई बंद झाले, त्यानंतर अहमदाबाद आणि आता बंगळूरचीही कनेक्टिव्हिटी बंद झाली. आता कोल्हापूर हे केवळ हैदराबाद आणि तिरुपती या दोनच शहरांशी हवाईमार्गाने जोडले आहे. पाच मार्गावर सुरू झालेली सेवा पुढे वाढत जाईल, अशी कोल्हापूरवासीयांची अपेक्षा होती. मात्र, काही दिवसांतच अपेक्षाभंग होऊ लागला आहे.

मुंबईशी कोल्हापूर जोडणार कधी?

कोल्हापूर हे किमान राज्याच्या राजधानीशी तरी नियमित जोडले जाणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा (airlines) खेळखंडोबा थांबविण्याची गरज आहे.

जाब कोण विचारणार?

प्रवाशांची सर्वाधिक पसंती कोल्हापूर विमानतळाला, कोरोना काळातही सर्वाधिक सेवा देणारे विमानतळ कोल्हापूर, ज्या ज्या मार्गावर विमानसेवा त्या मार्गावर चांगले प्रवासी देणारे कोल्हापूर असे असतानाही सेवा वाढण्याऐवजी बंद होत आहे. जिल्ह्यातील तीन खासदारांपैकी कोणी तरी याचा केंद्राला जाब विचारणार आहे की नाही, राजकारण विसरून कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न होणार की नाही, असा सवाल आहे.

नाईट लँडिंग रखडले

नाईट लँडिंग रखडलेेले आहे. यामुळे अनेकवेळा विमानसेवा खंडित होते. त्याचा फटका अनेकांना बसतो; पण ही सुविधा अजून तरी कोल्हापुरात सुरू करण्यात यश आलेले नाही.

धावपट्टी विस्तारीकरणाचे काम संथगतीने

धावपट्टीचे विस्तारीकरण संथगतीने सुरू आहे. 1370 मीटर असलेली धावपट्टी (जी छत्रपती राजाराम महाराज यांनी 1939 साली बांधली होती, ती आतापर्यंत कायम होती) आता 2300 मीटर केली जात आहे. सध्या 600 मीटरपर्यंत वाढवून ती 1970 मीटरपर्यंत केली आहे. मात्र, वाढीव धावपट्टी सध्या वापरात नाही.

धावपट्टी 3 हजार मीटरपर्यंत वाढवण्याची गरज

वास्तविक ही धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढविण्याची गरज आहे; पण जी 2300 मीटरपर्यंतच वाढवली जाणार आहे, त्यासाठीही आणखी दोन-तीन वर्षे तरी वाट पाहावी लागेल, अशीच स्थिती आहे.

टर्मिनस इमारत कधी पूर्ण होणार?

तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी 2019 रोजी टर्मिनस इमारत, धावपट्टी विस्तारीकरण कामाचा प्रारंभ झाला. त्यावेळी वर्षभरात हे काम होईल असे सांगण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटली तरी 50 टक्केही काम झालेले नाही.

कार्गो सेवेला मुहूर्त सापडेना

कार्गो सेवेला परवानगी मिळाली. मात्र, त्याची सुरुवात अद्याप झालेली नाही. त्याला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल आहे. जिल्ह्यातून कृषी आणि औद्योगिक उत्पादन निर्यातीला मोठी संधी आहे. मोठ्या प्रमाणात फुुले, साखर, गूळ अन्य राज्यांत जातो. कार्गो सेवेमुळे त्याचा शेतकर्‍यांना पर्यायाने जिल्ह्याच्या आणि परिसराच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. एकूणच विमानतळ विकासाकडेे सर्वच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

…असे आहे विस्तारीकरण

विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण आणि मजबुतीकरणासाठी 80 कोटींचा निधी आहे. 1370 मीटरची धावपट्टी 2300 मीटर केली जाणार आहे. ती आता 1970 मीटरपर्यंत विस्तारली आहे. 40 कोटी रुपये खर्चून टर्मिनस इमारत बांधली जात आहे. 3900 चौरस मीटर क्षेत्रात उभारली जात असलेली ही इमारत पर्यावरणपूरक होणार आहे. यामध्ये 300 प्रवाशांना बसता येईल अशी व्यवस्था आहे. 10 चेक इन काऊंटर, 8 सुरक्षा तपासणी बूथ, 2 बॅगेज क्‍लेम कॅरूजल, 1 व्हीआयपी लाऊंज असेल. 15 कोटी रुपये खर्चून 19.50 मीटर उंचीचा एटीसी टॉवर, टेक्निकल ब्लॉक व कॅटेगरी 6 चे अग्निशमन स्थानक बांधण्यात येत आहे. 5 कोटी रुपये वाहनतळ, अ‍ॅप्रोच शेड, इलेक्ट्रिक सब स्टेशन आणि सौंदर्यीकरणासाठी खर्च केला जात आहे.16 कोटी रुपये विमानतळाच्या सरंक्षक भिंतीसाठी खर्च करण्यात आले आहेत. या भिंतीचे बहुतांशी काम होत आले आहे.

कोल्हापूरला प्रचंड संधी

कोल्हापूरला प्रचंड संधी आहे. शहरालगत असलेल्या तीन औद्योगिक वसाहतींत सुमारे 3 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल हजारो कोटींच्या घरात आहे. औद्योगिक क्षेत्रासह कृषी, पर्यटन, धार्मिक, वैद्यकीय, व्यापार आदी विविध कारणांमुळे विमानसेवा विस्तारण्यास मोठी संधी आहे.

मंत्री बेळगावहून जातात मुंबईला

जिल्ह्यात तीन मंत्री, तीन खासदार व दहा आमदार आहेत. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील काही मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणारे मंत्री, अधिकारी हे मुंबईहून बेळगावला येतात आणि परत जातानाही बेळगावहून मुंबईला जातात. कोल्हापूरहून मुंबईसाठी एकही फ्लाईट नाही. याउलट बेळगावहून मुंबईसाठी दररोज दोन फ्लाईट आहेत.

बेळगाव, हुबळी गेले पुढे; कोल्हापूर पडले मागे

शेजारील बेळगाव आणि हुबळी ही दोन शहरे कोल्हापूरच्या पुढे गेली आहेत. चार वर्षांत कोल्हापूर हे पाच शहरांशी जोडले गेले, त्यातील तीन पुन्हा कमी झाली. याउलट बेळगाव 15 शहरांशी, तर हुबळी 10 शहरांशी जोडले गेले आहे. राज्यातील नाशिक शहर पाच राज्यांशी, नांदेड, जळगाव, औरंगाबाद ही शहरे चार शहरांशी जोडली गेली आहेत.

3 लाख 14 हजार प्रवासी

कोल्हापूर विमानतळावरून 9 डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2022 या सुमारे सव्वातीन वर्षांत 3 लाख 14 हजार 807 प्रवाशांनी ये-जा केली आहे. यापैकी मे 2020 ते फेबुवारी 22 या कोरोना कालावधीत 1 लाख 64 हजार 881 प्रवासी होते. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातही कोल्हापूर विमानतळावरून प्रवास केलेल्यांची संख्या राज्यात पाचव्या क्रमांकाची असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *