महागाईच्‍या झळांमुळे किचनमधून तेल ‘गायब

एकीकडे वाढता उष्‍म्‍याच्‍या झळा तर दुसरीकडे महागाईत होणार होरपळ. सध्‍या सर्वसामान्‍य नागरिक या दोन्‍ही झळांमध्‍ये करपत आहे. अशातच महागाईमुळे सर्वसामान्‍याचे जगण्‍यावर किती मर्यादा येतात याचीआकडेवारी एका सर्वेक्षणात समोर आली आहे. ( Edible oil ) खाद्य तेलाचे दर गगनाला भिडल्‍याने तब्‍बल २४ टक्‍के भारतीय कुटुंबीयांनी खाद्य तेल खरेदीत कपात केली असल्‍याचे या सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाले आहे. खाद्‍य तेलामुळे संपूर्ण महिन्‍याचे बजेट संभाळताना कसरत कराव्‍या लागणार्‍या गृहिणींनी स्‍वयंपाकातून आता तेलाचा वापरच कमी केला आहे.
२३ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत देशभरात वाढत्‍या महागाईचा सर्वसामान्‍यांच्‍या जगण्‍यावर झालेल्‍या परिणामाबाबत सर्वेक्षण घेण्‍यात आले. देशातील ३५९ जिल्‍ह्यांमधील तब्‍बल ३६ हजार ग्राहक यामध्‍ये सहभागी झाले. यात ६३ टक्‍के पुरुष तर ३७ टक्‍के ग्राहक या महिला होत्‍या.
सर्वेक्षणात २४ टक्‍के भारतीयांनी आपण दरवाढीमुळे खाद्य तेल खरेदीतचकपात केल्‍याचे सांगितले. २९ टक्‍के भारतीयांनी कमी प्रतीच्‍या तेलाला प्राधान्‍य दिले. तसेच खाद्य तेलावरील खर्च वाढल्‍यामुळे ६७ टक्‍के ग्राहकांनी अन्‍य बाबींवरील खर्च कमी केल्‍याचे सांगितले.
मागील काही महिन्‍यांमध्‍ये जागतिक बाजारपेढेत सातत्‍याने सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावर्षी देशात तेलबियांचे उत्‍पादन कमी झाले. त्‍यामुळे वार्षिक वापराच्‍या सुमारे ५५ ते ६० टक्‍के खाद्यतेल हे आयात करावे लागले. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेढेते मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्‍याने याचा फटका भारताला बसला आहे.

रशिया आणि युक्रेनयुद्धाचा फटका
केंद्र सरकारनेही आयात शुल्‍कामध्‍ये कपात करुन दरवाढ नियंत्रणात ठेवण्‍याचा प्रयत्‍न केले. यामुळे नोव्‍हेंबर २०२१मध्‍ये देशांतर्गत बाजारपेढेतील खाद्‍यतेलाच्‍या किंमती कमी झाल्‍या होत्‍या. मात्र मागील काही महिने खाद्यतेलाचा प्रमुख उत्‍पादक देशाने तेल निर्यातीवर घातलेले निर्बंध आणि रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे खाद्‍यतेलाच्‍या किंमती पुन्‍हा एकदा वाढल्‍या आहेत. कारण भारताला८० टक्‍क्‍यांहून अधिक सूर्यफूल तेल हे रशिया आणि युक्रेनमधून आयात होते. भारत दरवर्षी या दोन देशांकडून दरवर्षी २.५ -२.७ दक्षलक्ष टन सूर्यफूल तेल आयात करते. मागील वर्षी एप्रिल महिन्‍यातील खाद्‍यतेलाच्‍या तुलनेत यंदा वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *