कोल्हापूर : महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
‘अहिंसा परमोधर्म’ असा उपदेश जगाला देणारे भगवान महावीर यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिगंबर, श्वेतांबर बांधवांच्या वतीने विविध ठिकाणी धार्मिक विधी, शोभायात्रा काढण्यात आल्या. दोन वर्षांनंतर जैन मंदिर गजबजून गेली.
भगवान महावीर प्रतिष्ठान (कसबा गेट) समस्थ जैन समाजाच्या वतीने गुरुवारी सकाळी पार्श्वनाथ मानस्तंभ जिन मंदिर गंगावेस येथे महावीरांचा पंचामृत अभिषेक सोहळा, पाळणा, जन्मोत्सव असे कार्यक्रम झाले. यानंतर सर्वपंथीय जैन धर्मीयांच्या वतीने चांदीच्या रथातून भगवान महावीरांची शोभायात्रा काढण्यात आली. रथामध्ये भगवान महावीरांची मूर्ती घेऊन बसण्याचा सन्मान एन. एन. पाटील- सांगवडेकर परिवाराला मिळाला. कसबा गेट, भेंडे गल्ली, शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी रोड, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौकमार्गे दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये पंचामृत अभिषेकाने समारोप झाला.
दिगंबर जैन बोर्डिंग येथील मंदिरामध्ये सकाळी पंचामृत अभिषेक, मातेचा सवालासह 10 सवालांचा विधी ब—ाम्ही महिला मंडळाच्या वतीने पार पडला. सूत्रसंचालन राजकुमार चौगुले, संदीप पाटील यांनी केले. सर्व विधी पंडित पद्माकर उपाध्ये यांनी केले. दुपारी रथयात्रा पोहोचल्यानंतर पांडुक शिलेवर पंचामृत व प्रसाद वाटप करण्यात आले.
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर येथून चांदीच्या रथातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेत सामील तरुण, अबालवृद्ध, महिलांनी स्वामींचा जयजयकार केला. रथयात्रेत जैनीझम ग्रुप, नवकार ग्रुप यांच्यासह जैन मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. यासह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील मंदिरांमध्येही जनम कल्याणक उत्साहात साजरी झाली.