कोल्हापुरात जयश्री जाधव विजयी होतील : अजित पवार
कोल्हापुरात जयश्री जाधव विजयी होतील. आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी मेहनत घेतली आहे. कोल्हापुरात मविआचा विजय होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले,ररो सगळ्यांच म्हण होतं की, कोल्हापूर येथील जागा निवडून येणार. मतदानापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम शिवसेनेने मनापासून केले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनीदेखील बारकाईने लक्ष घातले.तसेच शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक तिथे प्रचाराला गेले. तिच गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत घडली. आम्ही सगळेच तेथे प्रचाराला गेलो होतो. आम्हाला काही निवडून येण्याची अडचण वाटत नाही. जवळपास ९ हजारांपेक्षा अधिकच लीड झालेले आहे. येथून पुढील राऊंडमध्ये ते लीड वाढत जाईल. परंतु, अंतिम निर्णय झाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, विजय निश्चित आहे. अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूर जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. असे सांगत जयश्री जाधव भावुक झाल्या.
कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात सुरु होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.