गोकुळचे दूध आजपासून चार रुपयांनी महागले
गोकुळने दुधाच्या विक्री दरामध्ये प्रति लिटर 4 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (दि. 16) करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गोकुळने अलीकडे दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये वाढ दिली. तेव्हाच विक्री दरात वाढ होणार हे स्पष्ट होते. गोकुळच्या निवडणुकीत नेत्यांनी विक्री दरामध्ये वाढ न करता दूध उत्पादकांना दरवाढ देऊ, असे सांगितले होते.
नूतन संचालकांनी हीच भूमिका घेतल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र सत्तेवर येऊन एक वर्ष होण्याअगोदर गोकुळच्या नूतन संचालकांनी ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला आहे. दूध उत्पादक शेतकर्यांना दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्यामुळे नाईलाजास्तव शहर व जिल्ह्यामध्ये फुल क्रिम दुधाच्या विक्री दरात शनिवारपासून (दि. 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून) वाढ करण्यात येत आहे. गोकुळचे फुल क्रिम दूध (200 मिली), प्रमाणित गाय व टोण्ड दुधाच्या विक्री दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दराच्या पिशव्या उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पिशवीतूनच दुधाचा पुरवठा करण्यात येईल, असेही विश्वास पाटील व गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सांगितले.
यापूर्वी गोकुळच्या खरेदी दरात जेवढी वाढ केली जायची, शक्यतो तेवढीच वाढ विक्री दरात होत असे. नूतन संचालकांच्या काळात मात्र दूध उत्पादकाला दोन रुपयांची वाढ करण्यात आली आणि ग्राहकांकडून चार रुपये वसूल करण्यात येणार असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.