राज्यात पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा बळी; पूरस्थिती कायम,

आज राज्यात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, सातारा आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान चंद्रपुरात 11 हजार हेक्टरवरील पिकं पाण्यात तर नाशिकमध्ये भातशेती, भाजीपाला पिकांचं नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या महिन्याभरात पावसामुळे 99 जणांचा बळी गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांनी जीव गमावला आहे.

पूरस्थिती निर्माण झाल्यानं नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुथडी वाहत असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच महिन्याभरात 181 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जीवितहानी टाळण्यासाठी पुराच्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात आठ दिवसात 35 लोकांचा पावसामुळे बळी गेला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरं वाहून गेलीत. मृत व्यक्तींमध्ये 24 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर 9 जणांचा मृत्यू पुरात वाहून गेल्यामुळे झाला. 8 दिवसाच्या या मुसळधार पावसामुळे 60 हजार हेक्टर वरच्या पिकांना फटका बसला आहे.

आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात तब्बल 4.51 ते 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या भरतीदरम्यान 50 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईत पाणी साठण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवाय भरतीदरम्यान नागरिकाना समु्द्रकिनारी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *