अजित पवारांचं एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना पत्र

राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून धुमशान घातले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेलं शेतजमीन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलावे अशी मागणी  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून ओला दुष्काळ दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

‘या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाऊसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली असून स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पाऊसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने  व आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये व राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे’ अशी मागणी अजितदादांनी केली आहे.

‘जोपर्यंत तेथील लोकप्रतिनिधी स्वत: पुढाकार घेऊन ही कामे यंत्रणेसोबत हातात हात घालून करत नाहीत तोपर्यंत नुकसानीचा अंदाज येत नाही. मंत्रिमंडळ स्थापन  न झाल्यामुळे पालकमंत्री जी जबाबदारी संभाळत असतात तेथे सुद्धा आज पालकमंत्री नसल्याने या यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या शासनाने 18 जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचे निश्चित केले होते. पंरतू राज्यातील राजकीय घडामोडीमुळे अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे गेले आहे. विविध माध्यमामध्ये वेगवेगळया तारखा जाहीर केल्या जात असून अधिवेशन कधी होईल याची निश्चिता नाही. माझी आपणास विधीमंडळातील सर्व पक्षांच्या विधानसभा सदस्यांच्या वतीने विनंती करतो की, 1 ऑगस्ट 2022 रोजी किंवा आपण या आठवडयातील शासनास सोयीच्या तारखेला अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही अजितदादांनी केली आहे.

‘राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह या मुद्यावर तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणीही अजित पवारांनी  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *