जिल्ह्यात व्हेंटिलेटरसह वैद्यकीय पथक तैनात
जिल्ह्यात स्वाईन फ्लू संसर्गाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस स्वाईन फ्लू रुग्णसंख्या (patient) वाढत आहे. सोमवारी तब्बल 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वीस दिवसांत 33 जणांना या आजाराचा संसर्ग झाला असून तिघा नागरिकांचा मृत्यू स्वाईन फ्लूच्या संसर्गामुळे झाला आहे. तर 9 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात 21 जणांवर उपचार सुरू आहेत. यामधील 10 जण व्हेंटिलेटरवर आहेत. सीपीआर प्रशासनाने स्वाईन फ्लू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. येथे व्हेंटिलेटरसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले आहे.
स्वाईन फ्लू बाधितांमध्ये (patient) हातकणंगले, हुपरी, निपाणी, कसबा बावडा, प्रतिभानगर, सांगली, रत्नागिरी, जाधववाडी, वाकरे, कदमवाडी, सांगवडेवाडी, जाधव पार्क, मोरेवाडी, राजारामपुरी, कलनाकवाडी येथील नागरिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांवर शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीपीआरने सुरू केलेल्या स्वाईन फ्लू कक्षात 20 बेड, 12 व्हेटिलेंटर तैनात ठेवले आहेत.
सध्या येथे दोन पुरुष व दोन महिला उपचार घेत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असणार्या रुग्णांनी आजार अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. वेळेत निदान झाल्यास उपचार करणे सोयीचे होत असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले.