अर्जुनवाडमध्ये आयकरकडून दुसर्या दिवशीही चौकशी
सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीतील अर्जुनवाड येथे गुरुवारी छापा टाकला होता. मात्र, गुरुवारी रात्रीपर्यंत झाडाझडती करूनही आयकर विभाग थांबला नाही, तर दुसर्या दिवशी शुक्रवारी दुपारी 1 वाजता पुन्हा पथक दाखल झाले होते. यातील काही कागदांच्या आधारे अनेकांची चौकशी करण्यात येत होती. हे पथक रात्री उशिरापर्यंत अर्जुनवाड येथे होते. त्यामुळे या चौकशीत काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवळा (जि. नाशिक), सोलापूर, बीड, पंढरपूर यासह 25 ठिकाणी गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. यात शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडमध्ये गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता पथकाने पोलिस बंदोस्तात छापा टाकला. दिवसभरात जयसिंगपूर संभाजीपूर येथील आलिशान उभारलेल्या बंगल्याची पाहणी करून चौकशी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटची पाहणी करून पुन्हा पथक अर्जुनवाड येथे आले होते. त्यानंतर या पथकाकडून रात्री आठ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.
दरम्यान, कारखाना भागीदाराच्या घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तर शुक्रवारी दुपारी हे पथक पुन्हा कारखाना भागीदाराच्या घरात आले. पुन्हा कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. यातील काही कागदांच्या आधारे अनेकांची चौकशी शुक्रवारी दुपारपासून सुरू होती. याबाबत आयकर विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काही स्पष्ट सांगता येत नसल्याचे सांगितले.