महागाईने घटणार दिवाळीचा गोडवा
एकीकडे इंधन, गॅस दरवाढ सुरू असतानाच साखर, तेल, डाळी, कडधान्ये, शेंगदाणे, ड्रायफ्रूटस् यांच्यासह दिवाळीतील फराळासाठी लागणार्या अन्य साहित्याच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ (increase) झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाच्या दिवाळीचा गोडवा घटणार आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवानंतर आता डाळी, तूप, तेल, पोहे, रवा, मैदा या वस्तूंच्या दरातही किलोमागे सुमारे 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे.
दिवाळी सण तोंडावर आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंसह फराळासाठी आवश्यक असलेल्या पोहे, रवा, मैदा या वस्तूंच्या दरातही किलोमागे साधारणतः 5 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या मैदा, साखर व रव्याचे दर प्रतिकिलो 40 ते 45, तर चिवड्याचे भाजके पोहे आणि शेंगदाणा दर 70 ते 160 वर पोहोचले आहेत. पिठी साखर 50-55 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. गाय किंवा म्हशीचे तूप 600 रुपये किलो आहे.
मालवाहतूक खर्च, पेट्रोल, डिझेल दरवाढ अशा कारणांमुळे फराळ तयार करण्यासाठी लागणार्या कच्च्या मालाचे म्हणजे डाळ, बेसन, साखर, तेल, मैद्याचे दर वाढले (increase) आहेत. याशिवाय दिवाळी फराळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध डाळींचा उपयोग होतो. हरभराडाळीपासून तयार केल्या जाणार्या पदार्थांमुळे त्याचीही मागणी वाढली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे डाळींच्या पिकांचे नुकसान झाल्याने येत्या काळात डाळींचे पिके घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.
ड्रायफ्रूटचेही दर वाढले
ड्रायफ्रूटचेही दर वाढले असून, काजू 800 ते 1,000, बेदाणे 300 ते 400, पिस्ता 2,400, आक्रोड 1,000 ते 1,500, चारोळी 1,500 ते 2,000, वेलदोडा 1,800 ते 2,000, जायफळ 1,200 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
चार दिवसांत खाद्यतेलात दरवाढ
सध्या बाजारात दिवाळीचा बाजार खरेदी करण्याची घाई पाहायला मिळते. त्यातच ऐन सणाच्या तोंडावर गेल्या चार दिवसांत खाद्यतेलाच्या किमती 5 ते 10 रुपयांनी महागल्या आहेत. इंधन दरवाढीमुळे किराणा माल, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने महिलांचे बजेट मात्र कोलमडले आहे.