शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये थैमान

(local news) जयसिंगपूर येथील खंडणी बहाद्दर व बनावट संघटनांनी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींमध्ये थैमान घातले आहे. पर्यावरण विभागाचे दाखले, अस्वच्छता, कामगारांचे विमा कवच नाही, त्यामुळे तुमची वरिष्ठ विभागाकडे तक्रार करू, अशा धमक्या देऊन लाखो रुपयांची माया मिळवल्याने शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील उद्योग-व्यवसायांत धास्ती निर्माण झाली आहे. याबाबत बालकामगारांची भीती दाखवून पाच लाख रुपये उकळल्याचे वृत्त प्रसिद्ध केलेे. या वृत्तानंतर झालेल्या फसवणुकीची उद्योग, व्यावसायिक माहिती देत आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बनावट विविध संघटना व खंडणी बहाद्दरांनी जयसिंगपूर येथे आलिशान कार्यालय थाटले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येक महिन्याला जाऊन पठाणी पद्धतीने वसुली केली जात आहे. या वसुलीतून या बनावट संघटनेच्या पदाधिकारी व खंडणी बहाद्दरांनी शोरूम, चारचाकी वाहन घेतले आहे. यातील सर्वच पदाधिकारी हे आलिशान बंगले उभारत आहेत. जयसिंगपूर येथील खंडणीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. जयसिंगपुरातील माजी नगरसेवकाकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या वतीने या खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या आवळून कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी जयसिंगपूर पोलिसांना दिली आहे. (local news)

‘त्या’ महिलेला केले जाते पुढे

बोगस संघटना व खंडणी बहाद्दरांनी टोळीत एक महिला घेतली आहे. औद्योगिक वसाहतीत किंवा अन्य ठिकाणी या खंडणी बहाद्दरांविरोधात आवाज उठविला; तर त्या महिलेला पुढे करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करू, अशीही धमकी दिली जात आहे.

फरशी कामगारांची लूट

राजस्थानी फरशी कामगारांना तुमची संघटना स्थापन करून तुम्हाला शासकीय अनुदान दिले जाईल, असे सांगून सुमारे 600 हून अधिक कामगारांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये घेतले आहेत. बनावट संघटनेचे अनेक जणांना ओळखपत्र दिले आहे. त्यामुळे ही लूट थांबवायची कशी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *