मेकर ग्रुपकडून फसवणूक; कॅनडाहून आलेल्या मुख्य एजंटला मुंबईत बेड्या
(crime news) आकर्षक परताव्याच्या आमिषाने 56 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानदेव बाळासाहेब कुरूंदवाडे (रा. चावरे, ता. हातकणंगले) याला कोल्हापूर पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली. तो मेकर अॅग्रो इस्टेट प्रा.लि. कंपनीचा मुख्य एजंट आहे. कुरूंदवाडे कॅनडाहून मुंबईत परतत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला विमानतळावरूनच ताब्यात घेतले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कुरूंदवाडे याला 30 सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते; मात्र त्याला अटक केव्हा केली, याबाबत सविस्तर तपशील पोलिसांकडून उपलब्ध झालेला नाही. कुरूंदवाडे याला 19 ऑक्टोबर रोजी न्यायालयलीन कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या कारनाम्यांची माहिती उघड झाली.
सविस्तर वृत्त असे की, मेकर अॅग्रो इस्टेट प्रा.लि. कंपनीने आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेतली होती. कंपनीचा एजंट कुरूंदवाडे यानेही यासाठी अनेकवेळा सेमिनार, बैठका घेऊन गुंतवणूकदारांना यामध्ये समाविष्ट करून घेतले होते. तसेच या रकमेची सुरक्षितता म्हणून गुंतवणूकदारांना खात्री पटवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या होत्या. त्याने स्वत:च मौजे सावर्डे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील 46 गुंठे जमीन खरेदी करून संचकारपत्र केल्याचाही पोलिसांचा संशय असून, त्याबाबत तपास होणार आहे. (crime news)
कुरूंदवाडे याला तात्पुरता जामीन मंजूर होताच तो दिल्लीहून कॅनडाला गेला होता. दि. 30 सप्टेंबरला तो मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.