बाजार समितीतील शेतकरी आणि व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान

गेली तीन वर्षे हमालांच्या दरवाढीबाबत करार झालेला नाही. हा करार करावा, हमालीच्या दरात तीस टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा उपनिबंधकांसमोर झालेल्या चर्चेत न्याय न मिळाल्याने बाजार समितीच्या गूळ विभागात काम करणार्‍या हमालांनी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात समितीतील 400 हमाल कामगार सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे सोमवारी सौदा झालेला दोन कोटींचा गूळ (jaggery) समितीत पडून आहे. यात शेतकरी आणि व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान, या संपात सहभागी झालेले हमाल, तोलाईदार अशा सुमारे 400 कामगारांना बाजार समिती प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

गूळ (jaggery) हंगाम अखेरच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सौदे बंद पडून चालणार नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू होणे अपेक्षित होते; पण ते न झाल्याने हमालांना बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे संघटनेचे नेते बाबुराव खोत यांनी सांगितले.

मजुरीच्या दरात वाढ करावी, यासाठी गेला दीड महिना हमालांनी आंदोलन सुरू केले आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले होते; पण त्यावर निर्णय झालेला नाही. यामुळे गुळातील हमालांनी सोमवारी दुपारीच काम बंद आंदोलन पुकारले. याबाबत जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्यासमोर चर्चा झाली; पण या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही, यामुळे मंगळवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. त्यानंतर हे कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत. यामुळे गुळाची तोलाई, शिलाई, भरणी, उतरणीचे काम ठप्प झाले आहे.

दरम्यान, समितीमध्ये मंगळवारी दुपारी अडते, व्यापारी, अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला हमालांना निमंत्रित करण्यात आले होते; पण ते आलेच नाहीत, यामुळे समितीने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *