“अशी सवलत भविष्यात पुन्हा मिळणार नाही” – प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे
महापालिकेतर्फे मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याज, चालू मागणीसह थकबाकीची (arrears) रक्कम एक रकमी भरल्यास दंड व्याजात सवलत जाहीर केली आहे. दि. 9 ते 28 फेब—ुवारीपर्यंत निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 50 टक्के तर 1 ते 31 मार्च पर्यंत 40 टक्के सवलत मिळणार आहे. चालू वर्षाचा घरफाळाही थकीत असणार्या मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
सवलतीच्या अंतिम तारखेपर्यंत थकबाकीदाराने मूळ थकबाकी, नोटीस व वॉरंट इत्यादीसह एकरकमी रोखीने भरल्यास दंड व्याजात सवलत मिळेल. थकबाकीसाठी मालमत्ता सील केलेल्या मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यायचा आहे, त्या कालावधीत कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घेतले पाहिजे. जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षणासाठी आवेदन, संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयातील दाखल दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर योजने अंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील. या योजनेचा लाभ सर्व शासकीय मिळकतींना देखील लागू आहे.
थकबाकी (arrears) न भरणार्या थकबाकीदारांच्या मिळकतीवर 1 एप्रिलपासून जप्ती, मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व अधिकारी कर्मचार्यांना दिले आहेत. अशी सवलत भविष्यात पुन्हा मिळणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त करदात्यांनी कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. बलकवडे यांनी केले आहे.
मालमत्ता कराची (घरफाळा) रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात जमा करण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सोईकरिता दि. 31 मार्च अखेर दर शनिवारी सुट्टीचे दिवशीही सर्व नागरी सुविधा केद्रें सुरू राहणार आहेत. घरफाळा रक्कम महापालिकेच्या kolhapurcorporation. gov. in या वेब साईटवर Online Payment करण्याची सुविधा आहे. गुगल पे व फोन पे वरूनही रक्कम भरता येणार आहे.