कोल्हापूर-गगनबावडा रोडवर पत्नीचा दगडाने ठेचून खून
(crime news) अनैतिक संबंधातून स्नेहल नितीन ऐवळे (वय 23, रा. खडकी, ता. मंगळवेढा, सोलापूर) हिचा दगडाने ठेचून तिच्या पतीने खून केला. ही घटना कोल्हापूर-गगनबावडा रोडवर बालिंगा (ता. करवीर) येथील भोगावती नदीवरील पुलाजवळील पाणंद रस्त्यावर घडली. संशयित पती नितीन दगडू ऐवळे (वय 32, खडकी, मंगळवेढा) स्वत: करवीर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.
यामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ऐवळे दाम्पत्य ऊसतोड कामगार असून मूळचे मंगळवेढा तालुक्यातील खडकीचे आहे. ऊसतोड टोळीत काम करणार्या एका तरुणाबरोबर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आल्याने तिचा कायमचा काटा काढल्याची कबुली संशयिताने दिल्याचे करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.
खडकी येथील ऊसतोड कामगार नितीन ऐवळे याचा नात्यातील स्नेहाशी 2014 मध्ये विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत. ते दोघेही ऊस तोडणी टोळीत काम करतात. चार महिन्यापूर्वीपासून ते कर्नाटकातील कारदगा (चिक्कोडी) येथील साखर कारखान्यासाठी काम करणार्या टोळीत काम करीत आहेत. (crime news)
मोबाईल चॅटिंग अन् अश्लील रेकॉर्डिंग जीवावर बेतले
स्नेहाचे टोळीतील एका तरुणाशी अनैतिक संबंध असावेत, असा नितीनला संशय होता. यावरून दोघात सतत वादावादी होत होती. या कारणातून त्याने पत्नीला मारहाणही केली होती. गेल्या आठवड्यापासून याच कारणातून त्यांच्यात पुन्हा वाद भडकला होता. स्नेहाच्या मोबाईलमधील चॅटिंग व संशयित तरुणाबरोबर पत्नीचे मोबाईलवर झालेले संभाषणही पतीच्या हाताला लागल्याने वाद विकोपाला गेला.
पायपीट करीत त्याने गाठले घटनास्थळ
सोमवारी दुपारी संशयिताने मुलांना पाहण्यासाठी गावाकडे जाऊया, असे सांगत तो पत्नीसमवेत कारदगा येथून बाहेर पडला व त्याने कोल्हापूर गाठले. दिवसभर दोघेही मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घुटमळत होते. सायंकाळी 7 वाजता दोघेही चालत कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा येथील पंचगंगा नदी पुलाजवळील पाणंद रस्त्यावर आले. उसाच्या शेतालगत दोघेही झोपी गेले.
गाढ झोपेत असताना डोके ठेचले
पहाटे चार वाजता दोघांत पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर स्नेहा झोपी गेली. अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या संशयिताने शेतात चेंबरजवळील मोठा दगड उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. या वर्मी हल्ल्यामुळे स्नेहा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहिली. अतिरक्तस्राव होऊन काही क्षणात तिचा मृत्यू झाला.
पोलिसांची तारांबळ
या घटनेनंतर संशयिताने सकाळी सात वाजता लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे गाठले. पत्नीचा खून केल्याचे सांगताच पोलिसांची तारांबळ उडाली. त्याला ठिकाण आठवत नव्हते. मात्र गगनबावडा रोडवर हा प्रकार घडल्याचे सांगताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलिसांच्या हवाली केले.
घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी
सुजय देवणे, श्रीकांत पाटील, विजय तळसकर,राजू जरळी या करवीर पोलिसांच्या पथकाने ठिकाण शोधून काढले. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, प्रभारी पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक अरविंद काळे आदी घटनास्थळी दाखल झाले.