मुदत संपताच सत्ताधारी आणि विरोधकांचे विजयासाठी दावे-प्रतिदावे सुरू
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर पंचवार्षिक कारखान्याची निवडणूक (election) प्रक्रिया सुरू झाली आहे. १४३ ‘ब’ वर्ग (संस्था सभासद) सभासद यादी कारखान्याने सादर केली आहेत. गुरुवार दि. ९ फेब्रुवारीपर्यंत ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत होती. १३२ सभासदांचे ठराव दाखल झाले आहेत. मुदत संपताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून संस्थागटातून विजयाचे दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. दरम्यान, आज ऊस उत्पादक सभासदांची यादी कारखान्याकडून सादर करण्यात येणार आहे.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (जि.कोल्हापूर) सन २०२२-२३ ते २०२७-२८ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक (election) अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयाकडून “ब” वर्ग संस्था सभासद यादी मागवण्यात आली. त्यानुसार कारखान्याने १४३ ‘ब’ वर्ग सभासदांची यादी सादर केली.
यादीतील सभासदांना ठराव दाखल करण्याची मुदत गुरुवार दि. ९ फेब्रुवारी होती. मुदती अखेर एकूण १३२ ‘ब’ वर्ग (संस्था सभासद) सभासदांनी ठराव दाखल केले तर ११ ‘ब’ सभासदांचे ठराव दाखल होऊ शकले नाहीत. तर ‘ब’ वर्ग (संस्था सभासद) ठराव दाखल करण्याची मुदत संपताच, सत्ताधारी गटाकडून १०२ ठराव दाखल केले.
डबल विजयाची हॅट्रिक अशा टॅगलाईनसह माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा फोटो शेअर करत सत्ताधारी गटाच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जात आहे. तर १०३ ठराव दाखल केल्याचा दावा करत विरोधी गटाचे प्रमुख आमदार सतेज पाटील गटाच्या समर्थकांकडून विजयाचा प्रतिदावा करण्यात येत आहे.