गोकाक येथील व्यापार्याचा कोल्हापूरच्या तरुणांकडून खून
(crime news) डॉक्टरकडून सुपारी घेऊन गोकाकमधील व्यापारी राजेश झंवर (वय 53) यांचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. झडतीत त्याच्याकडून गावठी बनावटीचे दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले. संशयिताचे चार साथीदार पसार असल्याने त्यांच्या नावाबाबत गोपनीयता पाळण्यात येत आहे.
राजेश झंवर आणि संशयित डॉक्टर एकमेकांचे विश्वासू मित्र होते. मात्र आर्थिक कारणातून त्यांच्यात मतभेद झाल्याने डॉक्टरने त्याचा कायमचा काटा काढायचे ठरवले. राजेश झंवर कोल्हापूरसह गांधीनगर परिसरातील नातेवाईक व मित्रांच्या संपर्कात होते. त्यामुळे झंवर वारंवार कोल्हापूरला येत असत. त्याचा फायदा घेत डॉक्टरने कोल्हापुरातील काही तरुणांना गाठून खुनासाठी सुपारी दिल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण व गोकाक पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिक संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. झडतीत त्याच्याकडून गावठी बनावटीची दोन पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयितासमवेत एलसीबीचे पथक सकाळी गोकाकला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. (crime news)
चार तरुणांनी व्यापारी झंवर यांचे अपहरण करून गोकाकजवळील कालव्यानजीक त्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून पुढे आली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत मृतदेह मिळाला नव्हता. बेळगावचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली. अन्य संशयित हाती लागल्यानंतर घटनाक्रम उघडकीला येईल, असेही सांगण्यात आले.