कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याला प्रशासनाचा ठेंगा

महापालिका कर्मचार्‍यांना 14 एप्रिलपूर्वी महागाई भत्ता (dearness allowance) देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर महागाई भत्ता देणार नसल्याचे मंगळवारी सायंकाळी स्पष्ट केल्याने प्रशासनाने कर्मचार्‍यांना ठेंगा दाखविल्याची चर्चा सुरू आहे. महापालिका कर्मचारी संघानेही कचखाऊ भूमिका घेतल्याने तीव— संताप व्यक्त केला जात आहे.

महागाई भत्त्यासह विविध कारणांसाठी कर्मचारी संघाने संपाची हाक दिली होती. त्यावेळी प्रशासन आणि कर्मचारी संघाच्या संयुक्त बैठकीत 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने त्यापूर्वी महागाई भत्ता देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार 2,700 कर्मचार्‍यांना सुमारे अडीच कोटी रुपये महागाई भत्ता मिळणार होता. 28 ते 31 टक्क्यांतील 9 महिन्यांच्या फरकाची ही रक्कम होती. महागाई भत्ता मिळणार, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांना होती. त्यानुसार अनेकांनी खर्चाची स्वप्नेही रंगविली होती.

प्रशासनाने महागाई भत्ता (dearness allowance) देण्याविषयी कोणतेच आर्थिक नियोजन केले नाही. कर्मचार्‍यांच्या खात्यावर फक्त पगार जमा केला. कर्मचारी संघानेही त्याविषयी प्रशासनाला जाब विचारला नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महागाई भत्त्याची रक्कम मिळालेली नाही; मग कर्मचारी संघाचे पदाधिकारी करतात तरी काय? अशी विचारणा कर्मचार्‍यांतून केली जात आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 14 एप्रिलपूर्वी महागाई भत्ता न मिळाल्याने कर्मचारी रोष व्यक्त करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *