तस्करीत कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधींच्या उलाढाली

(crime news) हिर्‍यापेक्षाही मौल्यवान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणीसह सर्वाधिक किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधींच्या उलाढाली होत आहेत. आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय तस्करांनी स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून व्हेल माशांच्या उलटीचा बाजार मांडला आहे.

प्रतिकिलो एक ते सव्वा कोटीचा भाव असलेल्या तस्करीत कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील कुख्यात तस्कर रातोरात मालामाल होत आहेत. कोकणसह गोव्यात तस्करीचे प्रमाण वाढत आहे. पर्यटनाच्या निमित्ताने काही आंतरराष्ट्रीय टोळ्यांचाही या परिसरात वावर वाढला आहे.

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अलीकडच्या काळात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्‍या सहा टोळ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापूर पोलिस दलाने नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदीप भालेरावसह साथीदारांना अटक करून सुमारे 5 कोटी 46 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. भालेरावसह साथीदार व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी गांधीनगर व शाहूपुरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने साडेपाच कोटींची उलटी जप्त केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीचा भाव

भारतात इतर किनारपट्टींप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळून येत आहे. व्हेल माशामध्ये दात असलेले आणि दात नसलेले अशा दोनप्रकारच्या प्रजाती आहेत. उलटीउपयुक्त असलेला स्पर्मव्हेल हा दात असलेल्या प्रजातीतला आहे. व्हेल मासा समुद्रकिनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा भाग किनार्‍यावर येण्यासाठी किमान वर्ष, दीड वर्षाचा कालावधी लागतो. व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळतात. मात्र, स्पर्मव्हेल प्रजातीच्या व्हेल माशाच्या उलटीलाच बाजारपेठेत कोट्यवधीचा भाव मिळतो. (crime news)

म्हाकुळमुळेच व्हेल कोकण किनारपट्टीकडे

कोकणातील खोलवर समुद्रात म्हाकुळची प्रचंड प्रमाणात पैदास होऊ लागली आहे. म्हाकुळ खाण्यासाठी व्हेल मासे कोकण किनारपट्टीकडे वळत आहेत. साधारणत:, व्हेल मासे दीड ते दोन टन वजनाचे असतात. एकाचवेळी शंभर ते दीडशे म्हाकुळ ते खाऊ शकतात. म्हाकुळच्या कवचधारी भागाचे पचन होत नाही. ते माशाच्या पोटात साठते. हा भाग उलटीच्या रूपाने बाहेर पडतो. समुद्रातील पाण्यावर उलटी तरंगते. त्याचा लगदा होऊन वर्ष, दीड वर्षाच्या काळानंतर हा लगदा समुद्रकिनारी येतो. त्यास उलटी म्हणून ओळखले जाते.

कर्नाटकातील साथीदाराला बेड्या

कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी (दि. 10) कोल्हापूर व बेळगाव येथील दोघांना गजाआड करून 1 कोटी 80 लाख रुपये किमतीची व्हेल माशाची 1 किलो 800 ग्रॅमची उलटी ताब्यात घेतली. अविनाश सुभाष खाबडे (रा. लिशा हॉटेलजवळ, शाहूपुरी ) व माधव विलास सूर्यवंशी (रा. बेडकीहाळ, ता. निपाणी) अशी जेरबंद करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.

सांगलीतही टोळीचा पर्दाफाश!

या कारवाईपाठोपाठ सांगली पोलिसांंनी स्थानिक सांगली आणि मालवण येथील दोन तस्करांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून 5 कोटी 70 लाख रुपये किमतीची 5 किलो 710 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली. स्थानिक तस्कर सलीम गुलाब पटेल (रा. खणभाग, सांगली) व अकबर याकूब शेख (पिंगुळी, ता. कुडाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे होती.

पुण्यातही व्हेलची 5 किलो उलटी हस्तगत

गतवर्षी डिसेंबर 2022 मध्ये पुण्यात 5 किलो व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली होती. तत्पूर्वी, जुलै 2021 मध्ये रायगडमधील लोणेरेत व्हेल माशाची उलटी घेऊन जाणार्‍या दापोलीतील एका तस्कराला जेरबंद करण्यात आले होते.

हिर्‍यापेक्षाही मौल्यवान

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे उंची अत्तर, सुगंधित उत्पादनामध्ये वापरतात. जगभरात उंची अत्तराची लाखोंच्या किमतीने विक्री होते. अगरबत्ती, धूप तसेच स्थिरीकरण द्रव्य (फिक्सेटिव्ह) म्हणून कपड्यावर, शरीरावर मारल्यास बराच काळ त्याचा सुगंध टिकून राहतो. उलटी नैसर्गिक असल्याने सेंटबरोबर त्याचा औषधासाठीही वापर केला जातो.

कुख्यात तस्करांमध्ये चढाओढ!

खोलवर समुद्रात सापडणारा स्पर्मव्हेल हा संरक्षित घटक आहे. त्यामुळे स्पर्मव्हेलची शिकार अथवा त्याच्याशी निगडित कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे. अलीकडच्या काळात समुद्रकिनार्‍यांवर व्हेलची उलटी सापडू लागल्याची ग्रामस्थांना माहिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *