आजर्‍यात 30 दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा

(crime news) आई-वडिलांसह मुलाला बांधून मारहाण करीत 30 जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातला. ही घटना आजरा तालुक्यातील खानापूर पैकी रायवाडा येथे घडली. या घटनेत वडील व मुलगा जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी 7 तोळे सोने आणि 220 डुकरे चोरून नेली आहेत. एकूण ऐवज 30 लाख रुपयांचा आहे.

खानापूर येथील प्रल्हाद राजाराम गुरव यांचा रायवाडानजीक चिरका या शेतावर राज कॅश्यू इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रो फार्म या नावाने वराहपालन व काजूचा व्यवसाय आहे. प्रल्हाद गुरव, त्यांची पत्नी पूनम व मुलगा राजेश हे तेथेच राहतात.

30 दरोडेखोर दोन वाहने घेऊन आले

बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस दरोडेखोर दोन मालवाहतूक वाहनांमधून आले व त्यांनी गुरव यांच्या काजू फॅक्टरीचा दरवाजा तोडला.

दरोडेखोर धिप्पाड व सशस्त्र

दरोडेखोरांच्या हातांमध्ये बॅटरी, लाकडी दांडके, तलवार, लोखंडी रॉड होते. ते मराठी व कन्नड भाषेत बोलत होते. सर्वजण धिप्पाड व काळे कपडे घातलेले तसेच तोंडाला रुमाल व मास्क लावलेले होते. काही दिवसांपूर्वी गुरव यांच्याकडून काही व्यक्तींनी डुकरांची खरेदी केली होती. त्यानंतर काही व्यक्ती परिसरात येऊन गेल्याचे गुरव यांनी पोलिसांना सांगितले.

पती-पत्नी व मुलाला बांधून घातले

त्यांनी गुरव पती-पत्नी व मुलाला मारहाण करीत दोरीच्या साहाय्याने खुर्ची व कॉटला बांधून घातले. मुलगा राजेशच्या डोक्यावर हेल्मेट घातले तसेच गुरव पती-पत्नीच्या डोक्यावर कापड टाकले. गुरव यांचे मोबाईल काढून घेत ते फोडून टाकले. परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत का? याबाबत विचारणा केली. तसेच सर्व वाहनांच्या चाव्या ताब्यात घेतल्या. (crime news)

श्वानपथक घटनास्थळी घुटमळले

या घटनेनंतर जवळच राहायला असलेला गुरव यांचा कामगार दशरथ कोरवी याने येऊन गुरव कुटुंबीयांची सुटका केली. पोलिस पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. कोल्हापूरहून ‘स्टेला’ या श्वानाला पाचारण करण्यात आले; पण ते काजू फॅक्टरीच्या परिसरातच घुटमळले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तसेच ठसे तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी येऊन गेले.

एक संशयित ताब्यात

आजरा, नेसरी, गडहिंग्लज, चंदगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी बेळगाव येथील रुक्मिणीनगर येथे राहणार्‍या रवी नाईक या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्हा कबूलही केला आहे. त्याच्या सोबतीला आणखीन सहाजण असल्याचे समजते. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.

काजुगरासह काजू बियाही लंपास

त्यांनी काजू फॅक्टरीतील तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेतली. त्याचबरोबर दरोडेखोरांनी वराहपालनातील 220 डुकरे सोबत आणलेल्या मालवाहतूक वाहनांमध्ये घातली. तसेच 150 किलो तयार काजुगर, 500 किलो काजू बिया, 7 तोळे सोने, 15 तोळे चांदी, रोख 25 हजार रुपये, असा बाजारभावाप्रमाणे सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मात्र, आजरा पोलिसांत 9 लाख 17 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याबाबत नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *