हेर्लेत मोठा तणाव; गावाला पोलिस छावणीचे स्वरूप

हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उभा केलेला डिजिटल फलक (Digital board) एकाने फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला. संशयित रियाज मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढत माळ भागावरील संजयनगर येथील बेकायदेशीर बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी गावात मोठा तणाव निर्माण झाल्याने कोल्हापूरचे आर. सी. पथक, हातकणंगले, पेठवडगाव येथील पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

हेर्ले येथील संजयनगरमध्ये परिसरातील युवकांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा फलक लावला होता. फलक लावताना एका कुटुंबाने फलक लावण्याला विरोध केला होता. तसेच फलक काढून टाकण्याची धमकीही दिली होती. वाद टाळण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी फलकाची जागा बदलली. सोमवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये दंग होते. दरम्यानच्या काळात तीन वेळा वीज घालवून डिजिटल फलक फाडण्यात आला. मिरवणूक प्राथमिक शाळेजवळ आली असता फलकाची (Digital board) विटंबना केल्याचे लक्षात येताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी संशयिताला लाखोली वाहत हातात दगड घेऊन संशयित मुजावर याच्या घरावर चाल करून गेले. मात्र पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तातडीने मुजावरला ताब्यात घेतले व कार्यकर्त्यांना परत पाठवून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. याबाबत कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

गावात रात्रभर तणाव होता. मंगळवारी सकाळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीवर चाल करून गेल्या. यावेळी बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात यावे, महिलांना लहान मुलींना नाहक त्रास देणार्‍या समाजकंटांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच गाव बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही दिला. संशयित रियाज मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायतीकडून संशयित बांधकाम बेकायदेशीर असेल तर बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच राहुल शेटे यांनी दिले.

हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक महादेव तोंदले, वडगावचे पोलिस निरीक्षक भैरवनाथ तळेकर, पोलिस उपनिरीक्षक यशवंत उपराटे यांनी खबरदारी घेऊन शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापही वातावरण तणावपूर्ण असून गावामध्ये पोलिसांची कुमक तैनात आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जयसिंगपूरचे विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांनीही गावाला भेट देऊन चौकशीअंती गुन्हेगारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *