सर्वसामान्यांना मोठा दिलासा!
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या नव्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये अद्याप संभ्रम असताना, राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच सहकारी बँकांसह नागरी पतसंस्थांमध्येही खातेदारांना या नोटा भरता येणार असल्याने सर्वसामान्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी सहकारी बँकांमधून नोटा बदलता येणार असून, पतसंस्थांना नोटा बदलून देण्याची मुभा नाही. पतसंस्थांच्या खातेदारांना (account holders) फक्त भरणा करता येईल, असे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
रिझर्व्ह बँकेने दोन हजारच्या नोटा बदलण्यासंदर्भात नुकताच देशातील सर्व बँकांना आदेश लागू केला आहे. राष्ट्रीयीकृत किंवा सरकारी बँकांमध्ये खाते नसल्यास काय करायचे, या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकेचे निरसन सहकारातील तज्ज्ञांनी केले आहे.
‘दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांपुढे रांगा लावण्याची गरज नाही. ३० सप्टेंबरनंतरही दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये वैध ठरणार असल्याने कमिशन देऊन नोटा बदली करून घेऊ नका. स्वतःचे आर्थिक नुकसान करू घेऊ नये,’ असे आवाहन राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.
नोटा नाकारता येणार नाही
दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारण्याचा अधिकार ३० सप्टेंबरपूर्वी अथवा त्यानंतरही कोणत्याही बँकांना नाही. दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ‘कलम १२४ अ’ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
नोटा कायदेशीर वैधच
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. ३० सप्टेंबरनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा ‘कागज का तुकडा’ राहणार नाही, तर त्याला त्यानंतरही कायदेशीर वैधता राहील. ३० सप्टेंबरनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा शिल्लक राहिल्यास नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्या नोटा वापरता येऊ शकतील किंवा त्या बदलता येतील, याबाबत ‘आरबीआय’कडून सुधारित आदेश निघण्याची शक्यता असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
पतसंस्थांमध्ये खातेदारांना (account holders) दोन हजारांच्या नोटा भरता येतील. पतसंस्थांमधून नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत किंवा पतसंस्थांच्या नोटा सहकारी बँका घेणार नाहीत; याबाबत गैरसमज असण्याचे कारण नाही. नागरिक पतसंस्था किंवा त्यांचे खाते असलेल्या सहकारी; तसेच राष्ट्रीयकृत बँकेत दोन हजारांच्या नोटा जमा करू शकतात. – विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बँक
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात ‘आरबीआय’ने काढलेले आदेश हे सर्व नागरी बँकांसाठी लागू आहेत. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या सहकारी बँकेतून बदलून घेता येणार आहेत. – अनिल कवडे, सहकार आयुक्त