…तर शरद पवार संसदेच्या उद्घाटनाला आले असते; भाजपचा मोठा गौप्यस्फोट
(political news) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. मात्र त्यापूर्वी उद्घाटनावरून चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळालं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. नवीन संसद भवन उभारताना विरोधकांना विचारात घेतलं नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या टीकेला भाजप नेते राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले राम शिंदे?
भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. शरद पवार यांना संसदीय कामकाजाचा साठ वर्षांचा अनुभव आहे. या साठ वर्षांमध्ये त्यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. सत्तेत असताना विरोधी पक्षाची काय भूमिका असते आणि सत्ताधाऱ्यांची काय भूमिका असते हे पवारसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणं गरजेचं होतं. कदाचित इतर पक्षाच्या दबावामुळे ते सहभागी झाले नाहीत. अन्यथा पवारसाहेब नक्की या कार्यक्रमात सहभागी झाले असते असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी काय म्हटलं होतं?
‘साधी गोष्ट अशी आहे की, मी अनेक वर्षांपासून राज्यसभेचा सदस्य आहे, आम्ही ज्या संसद भवनात बसतो तिथे नवी वास्तू बांधायची हे वृत्तपत्रात वाचलं. असा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर संसदेतील सदस्यांशी चर्चा करायची आणि त्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. भूमिपूजन केलं, त्यासाठी विश्वासात घेतलं नाही. आता संसद भवनाची इमारत तयार झाली तर उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होत असते, ही पद्धत आहे. पण त्यांनी तेही केलं नाही. ज्या प्रकारे कार्यक्रम चालला आहे, त्याची चर्चाही कधीच केली नाही. त्यामुळे कुणाला विश्वासात न घेता निर्णय घेतला आहे. आता विरोधी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका घेतली आहे, त्याला माझा पाठिंबा असल्याचं’ शनिवारी शरद पवार यांनी म्हटलं होतं. (political news)