कोल्हापुरात प्रथमच गोल बुब्बुळाच्या पालीची नोंद
कोल्हापूर परिसरात प्रथमच आकर्षक गोल बुब्बुळाच्या पालीची नोंद झाली आहे. केरळ-तामिळनाडू परिसरातून येणार्या लाकडाच्या वाहतुकीतून छत्रपती राजाराम टिंबर मार्केट परिसरात ही पाल आल्याची माहिती संशोधक (Researcher) विवेक कुबेर यांनी दिली.
‘निमास्पीस ग्रासीलीस’ ही पाल तिचा नैसर्गिक अधिवास सोडून इतरत्र प्रसारीत झाल्याची पहिलीच नोंद कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातून करण्यात आली. ही पाल विवेक कुबेर यांना टिंबर मार्केट परिसरात घरांच्या भिंती, लाकडांचे ओंडके आणि झाडांवर आढळून आली. ‘निमास्पीस ग्रासीलीस’ या गोल बुब्बुळाच्या पालीचा शोध 1870 मध्ये रिचर्ड बेडोम या ब्रिटिश संशोधकाने (Researcher) लावला. अंगावरील आकर्षक रंग आणि छोट्या आकारांवरून या पाली लक्ष वेधून घेतात. त्यांच्या या आकर्षक रंगावरूनच त्यांचे नामकरण ‘ग्रासीलीस’ असे केले आहे. ‘निमास्पीस ग्रासीलीस’ या गोल बुब्बुळाच्या पालीचा अढळ आणि पुनर्वर्णन करणारा शोधनिबंध ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाला. या संशोधनात ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्राणी शास्त्राचे प्रा. सुनील गायकवाड आणि बीएनएचएसचे सौनक पाल यांचा सहभाग आहे. हा शोधनिबंध हा प्रा. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अक्षय खांडेकर यांच्या पीएच.डी. संशोधनाचा भाग आहे.