मुख्यमंत्रीपद राजीनाम्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

(political news) अजित पवार यांच्या रुपाने भाजपला नवा भिडू मिळाला आहे. अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. अजित पवार सुद्धा 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत आले आहेत. शिवाय शरद पवार यांच्या सारख्या बलाढ्य नेत्याला मात देऊन ते भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान आलं आहे. आपल्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यानंतर सर्वाधिक कोंडी शिंदे गटाची झाली आहे. शिंदे गटाला विचारात न घेता भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्याचं सांगितलं जात आहे. ज्या अजित पवार यांना कंटाळून शिवसेना सोडली, त्याच अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे गटाला काम करावं लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला वटवृक्ष तुम्ही तोडलात का? असा सवाल आता शिवसैनिक शिंदे गटाला विचारण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा गट सोबत आल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याने काल मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत अनेकांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे.

राजीनामा देत नाहीये

आमदारांची ही नाराजी असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा इतक्या सुरू झाल्या की स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावर खुलासा करावा लागला आहे. मी राजीनामा देत नाहीये. या बातम्या कोण पसरवत आहे हे मला चांगलं माहीत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (political news)

तुम्हाला निराश करणार नाही

माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण प्लांट करत आहे हे मला माहीत आहे. मी राजीनामा देणार नाही. मी 50 आमदारांना निराश करणार नाही. या आमदारांनी संकट काळात मला साथ दिली आहे. त्यामुळे मी त्यांना कधीच निराश करणार नाही, असं शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

माझच कंट्रोल

2024मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादा पवार आपल्यासोबत आल्याने चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्रीपद अजूनही माझ्याकडे आहे. आणि सरकारवर माझच कंट्रोल आहे. अजित पवार यांना सरकारमध्ये घेणं हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वगळून ही युती झाली आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही, असं शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *