सातारा-कागल महामार्गाचं काम बंद पाडणार; कोणी दिला प्रशासनाला इशारा?

सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या (Highway) सहापदरीकरणांतर्गत मलकापूर व कऱ्हाडच्या हद्दीत मलकापुरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा कऱ्हाडातून न घेता महामार्गाच्या कडेने थेट कोयना नदीपात्रात पाइपलाइनद्वारे करावा.

नवीन सहापदरी रस्त्यामध्ये पाइप टाकावी. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने ही कामे करावीत, अन्यथा शहर हद्दीत महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे (Yashwant Vikas Aghadi) नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिला.

यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यात म्हटले आहे, की दक्षिण उत्तर दिशेने राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यामुळे शहराच्या हद्दीचे दोन भाग झाले आहेत. बराच भाग महामार्गाच्या पश्चिम बाजूस आहे.

पश्चिम बाजूस मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असून, नगरपरिषद या भागात विविध मूलभूत सुविधा पुरवत आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने या नागरी भागासाठी नागरी सुविधा पुरवण्यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पाणीपुरवठा, जलनिस्सारण, सांडपाणी निस्सारण आदींसाठी युटिलिटी पाइपलाइन आताच टाकून देणे गरजेचे आहे.

नगरपरिषदेच्या हद्दीलगत दक्षिण बाजूस मलकापूर नगरपरिषदेची हद्द आहे. मलकापूर नगरपरिषदेचे हद्दीतून महामार्गाच्या पूर्व बाजूने संगम वाइन शॉपसमोरून जमिनीच्या उताराने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शहराच्या हद्दीत येते व तेथून ते कोयना नदीत मिसळते. मलकापूरमधून येणारे पाणी हे गटारीमधून वाहत येते. या गटारीचा आकार कमी असल्याने पाणी रस्त्यावरून वाहते.

त्याचबरोबर नागरिकांच्या घरे, दुकान गाळ्यांमध्ये शिरते. यामुळे येथील रहिवाशांच्या सतत पालिकेकडे तक्रारी येत असतात. मलकापूर हद्दीतून येणारे पाणी शहराच्या हद्दीतून न घेता ते महामार्गाच्या पूर्व बाजूने उत्तरेस थेट कोयना नदीपात्रात पाइपलाइन टाकून निचरा केल्यास सर्व समस्या मिटणार आहेत.

याबाबत महामार्गाचे (Highway) ठेकेदार अदानी ग्रुपचे प्रोजेक्ट मॅनेजर व डी. पी. जैन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक यांना समक्ष साइटवर नेऊन अडचणी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या महामार्गाच्या पश्चिमेकडील नागरी वसाहतीसाठी मूलभूत सुविधा पुरवण्याकरिता सहापदरीचे काम पूर्ण होण्याआधीच युटिलिटी पाइपलाइन महामार्ग विभागाकडून टाकून मिळाव्यात.

त्याचबरोबर मलकापूर हद्दीतून सध्याच्या महामार्गाच्या पूर्व बाजूने कऱ्हाडच्या हद्दीत येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा नियोजित महामार्गाच्या पूर्व बाजूने उत्तर दिशेने थेट कोयना नदीपात्रात पाइपलाइन टाकून करण्याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीस शासनाकडून आदेश द्यावेत. हे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *