भारतीयांची मान उंचावणारे लिटिल मास्टर यांचे जबरदस्त रेकॉर्ड्स

(sports news) जागतिक क्रिकेटमध्ये भारतीयांची मान उंचावणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आज (10 जुलै) सुनील गावसकर यांचा 74 वा वाढदिवस आहे. ‘लिटिल मास्टर’ (Little Master) नावाने आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या सुनील गावसकर यांच्या नावे अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत. खेळपट्ट्या जेव्हा फलंदाजांसाठी फार मैत्रीपूर्ण नव्हत्या त्या काळात सुनील गावसकर यांनी मैदान गाजवलं होतं.

सुनील गावसकर यांची फलंदाजी तसंच मैदानवरील निर्भिडता भारतीय प्रेक्षकांना फार आवडायची. मैदानात हेल्मेट न घालता घातक गोलंदाजांचा सामना करणाऱ्या सुनील गावसकरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. नोव्हेंबर 1987 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे सुनील गावसकर 16 वर्षं भारतासाठी खेळले. यादरम्यान, त्यांनी अनेक मोठमोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

10 हजार धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटर

गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणारे पहिले क्रिकेटपटू होते. 7 मार्च 1987 रोजी अहमदाबाद येथे पाकिस्तानविरोधातील कसोटी सामन्यात त्यांनी हा टप्पा गाठला. या दिवशी त्यांने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार 122 धावा पूर्ण केल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये 34 शतकं

लिटल मास्टरने शतकांच्या यादीतही राज्य केलं. 125 कसोटी सामने खेळल्यानंतर त्यांनी 34 शतकं झळकावली. बरीच वर्षं हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर कायम होता. नंतर 2005 मध्ये सचिन तेंडुलकरने हा विक्रम मोडला.

वेस्ट इंडिजविरोधात 13 शतकं

70 आणि 80 च्या दशकात वेस्ट इंडिज संघ सर्वोत्तम संघ होता. त्यांचा पराभव करणं जवळपास अशक्य होतं. पण सुनील गावसकरांसाठी मात्र फलंदाजी करण्यासाठी हा आवडता संघ होता. त्यांनी वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये 13 शतकं ठोकली. (sports news)

वेस्ट इंडिजविरोधात मालिकेत 774 धावा

सुनील गावसकर एकमेव खेळाडू आहे, ज्याने वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेत 774 धावा केल्या.

संपूर्ण डाव खेळणारे पहिले फलंदाज
पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद कसोटीत संपूर्ण डाव खेळणारे सुनील गावसकर पहिले भारतीय होते. त्या डावात त्यांनी 127 धावा केल्या होत्या.

चार वेळा 1 हजार धावा

सुनील गावसकर एका वर्षात चार वेळा 1000 पेक्षा जास्त धावा करणारे एकमेव फलंदाज आहेत.

शतकं ठोकण्याचा विक्रम

दोन क्रिकेटच्या मैदानावर सलग सर्वाधिक शतके ठोकणारे ते जगातील एकमेव फलंदाज आहेत. त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन आणि वानखेडे स्टेडियम या दोन्ही ठिकाणी सलग चार शतके झळकावली.

झेल घेण्याचंही शतक

सुनील गावसकर उत्तम फलंदाजासह एक चांगले क्षेत्ररक्षकही होते. यष्टीरक्षक वगळता कसोटी क्रिकेटमध्ये झेलच्या बाबतीत शतक करणारे ते पहिला भारतीय खेळाडू होते. कसोटी कारकिर्दीत त्यांनी एकूण 108 झेल घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *