इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा!
इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाणे राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. याबाबतचा पुरस्कार (Award) सोहळा मुंबई येथे झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना पुरस्कार देऊन गौरवले.
देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याची निवड प्रक्रिया होते. 2021 या वर्षातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेसाठी राज्यातून कार्यमूल्यांकनाद्वारे 5 पोलिस ठाण्यांची सर्वोत्कृष्ट ठाणे म्हणून घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये शिवाजीनगर पोलिस ठाणे अव्वल ठरले होते. त्याचा पुरस्कार वितरण समारंभ पोलिस महासंचालक कार्यालयात पार पडला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालिन निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ट्रॉफी, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे (Award) स्वरूप होते. यावेळी गृहसचिव, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित तसेच राज्यातील पोलिस दलातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाणे संवेदनशील आहे. मात्र येथील गुन्हेगारी रोखण्यासह समाजाभिमुख काम वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या वेळोवेळी सूचना, आदेश यामुळे झाले. त्यामुळे हे यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया यावेळी पिंगळे यांनी व्यक्त केली.