“मला संघातून का वगळलं माहिती नाही”, भारताच्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट

(sports news) भारतीय कसोटी संघात (Indian Test Cricket Team) नेहमी स्थान दिलं जाणाऱ्या हनुमा विहारीला (Hanuma Vihari) वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) मालिकेतून वगळण्यात आलं आहे. विदेशातील मालिकांमध्ये हनुमा विहारीला संघात नेहमी स्थान दिलं जात होते. 29 वर्षीय हनुमा विहारीने आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळले आहेत. जुलै 2022 मध्ये त्याने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. इंग्लंडविरोधात हा सामना खेळण्यात आला होता. पण त्यानंतर हनुमा विहारीला दुर्लक्षित करण्यात आलं आहे. पण नुकतंच त्याने संघात स्थान दिलं जात नसल्याने नाराजी जाहीर करत भाष्य केलं आहे.

हनुमा विहारीने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना हे नक्कीच निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. “मला संघातून वगळण्यात का आलं याचं कोणतंही कारण मला सापडलं. ही एकच गोष्ट मला सतावत आहे. कोणीही माझ्याशी संपर्क साधत संघातून का वगळत आहोत याची माहिती दिली नाही. मला सावरण्यासाठी काही वेळ लागला. पण मी आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहिले असून मला आता त्याची चिंता नाही. मी आता फार मनाला लावून घेत नाही. मी भारतीय संघात आहे किंवा नाही याचा फार त्रास करुन घेत नाही. जिंकण्यासाठी इतर सामनेही आहेत. शेवटी ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं आहे,” असं हनुमा विहारीने सांगितलं आहे.

दरम्यान, रोहित शर्माने बुधवारपासून डोमिनिका येथे सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात नव्या जोडीदारासह खेळाची सुरुवात करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2023-25 साठी होणाऱ्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशपच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ नव्या ओपनिंग जोडीचा पर्याय तपासणार आहे. 21 वर्षीय यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासह फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.

जैस्वालने 2023 आयपीएलमध्ये 48 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा ठोकल्या. तसंच पहिल्या 26 फर्स्ट क्लास इनिंगमध्ये 80 पेक्षा जास्त सरासरीने 625 धावा केल्या. गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफी फायनलच्या दुसऱ्या डावात 265 धावा करत जैस्वालने चांगली खेळी केली होती.

वेस्ट इंडिज दौऱ्यातून चेतेश्वर पुजारालाही वगळण्यात आलं आहे. त्यामुळे त्याची तिसऱ्या क्रमांकाची जागा भरण्यासाठी शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं असं रोहित शर्माने सांगितलं आहे. पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितलं की “शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा असल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं जाऊ शकतं”. (sports news)

“त्याने राहुल द्रविडशी चर्चा करताना मी आतापर्यंत सर्व क्रिकेट तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच खेळलो असल्याचं सांगितलं. तसंच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास माझ्या संघासाठी अधिक चांगली कामगिरी करू शकेन असा त्याला विश्वास आहे. ते आमच्यासाठी देखील चांगले आहे. कारण त्यामळे डावं आणि उजवं हे चांगलं समीकरण जुळत आहे,” असं रोहित शर्माने सांगितलं.

पुढे तो म्हणाला की “मला वाटतं मी हा प्रयत्न करुन पाहू शकतो आणि हे फार काळ सुरु राहील अशी आशा आहे. आम्ही अनेक वर्षांपासून डावं, उजवं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आम्हाला डावखुरा फलंदाज सापडला आहे, तर तो चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. स्वत:च्या बळावर ते संघात जागा निर्माण करतील”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *