महाराष्ट्रात ‘स्वयंसिद्धा’ योजना बंद; पण ‘राजमाता’ सुरू
महिला-मुलींवरील हल्ले, त्यांच्या हत्या रोखण्यासाठी उपाय-योजना म्हणून राज्य सरकारने (government) 2001 ला सुरू केलेली स्वयंसिद्धा स्वसंरक्षण योजना कालांतराने बंद झाली. यावर्षी पुन्हा महिलांसाठी तीच योजना राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम या नावाने सुरू करण्यात आली आहे. योजनेचे केवळ नावच बदलण्यात आले आहे.
स्वयंसिद्धा योजना दहा वर्षांपासून बंद
महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण 2001 मध्ये आबालवृद्धांसाठी शारीरिक सुद़ृढता व आरोग्यसंपन्न कार्यक्षम जीवनाची कल्पना गृहीत धरून ‘खेळाद्वारे सर्वांसाठी सुद़ृढता’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. विशेषत: महिलावर्गाला स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज असल्याने त्यांच्यासाठी स्वयंसिद्धा ही योजना सुरू करण्यात आली. समाजातील विविध घटनांमुळे महिलांच्या मनात निर्माण झालेली भीती घालवून आत्मविश्वासपूर्ण स्वसंरक्षणाची मानसिकता निर्माण करण्याच्या द़ृष्टीने हे प्रशिक्षण दिले जात होते.
प्रामुख्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त बाहेर पडणार्या महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित करणे व त्या अनुषंगाने त्यांच्या शारीरिक सुद़ृढतेबाबतही प्रबोधन करण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाने ‘स्वयंसिद्धा’ हा स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविला. क्रीडा व युवक सेवा संचलनालयाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ज्युदो व तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या दोन क्रीडा संघटनांशी विचारविनिमय करून ही योजना सुरू करण्यात आली होती.
एका केंद्रावर सकाळी-संध्याकाळी सुमारे 30 महिलांना प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती. महाविद्यालये, शाळा, महिला वसतिगृहे, स्वयंसेवी मंडळे येथे ही केंद्रे सक्रिय होती. अचानक होणार्या हल्ल्यांपासून बचावाबरोबरच स्वसंरक्षणाबाबत कायद्यातील तरतुदी, शारीरिक तंदुरुस्ती, संतुलित आहार, सुरक्षा उपाय याबाबतही प्रबोधन केले जात होते. केवळ शासनाची एक योजना नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा एक उपक्रम म्हणून याचा प्रचार करण्यात आला होता. वास्तविक स्वयंसिद्धा ही जुनी योजना 2001 पासून पुढील दहा-बारा वर्षे प्रभावीपणे राबविण्यात आली होती.
पारंपरिक शिवकालीन युद्धकलेचीही त्याला जोड देण्यात आली होती; मात्र कालौघात दुर्लक्षामुळे योजना बंद पडली. महिलांवरील हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाल्याने शासनाला पुन्हा या योजनेची आठवण झाली आहे.
तीच योजना नव्याने सुरू
महाराष्ट्रात महिला-मुलींच्या होणार्या निर्घृन हत्या, हिंसाचार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या वतीने राज्यातील प्रत्येक तालुक्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम योजना राबविण्याचा शासन (government) निर्णय 23 जून रोजी घेण्यात आला आहे. जुन्याच योजनेप्रमाणे क्रीडा विभाग व काही संस्था-संघटनांच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येणार आहे.