मोस्ट वाँटेड गँगस्टर्सचे कोल्हापूर कनेक्शन!
मुंबई, पुण्यासह राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील पोलिस यंत्रणांना चकवा देणार्या मोस्ट वाँटेड टोळ्यांतील खतरनाक गुंडांसाठी (hooligan) पुणे- बंगळूर महामार्ग आश्रयाचा अड्डा बनला आहे. स्थानिक कनेक्शनमुळे कुख्यात गुंडांचा कोल्हापूरसह उपनगरामध्ये वर्दळ वाढू लागली आहे. गँगस्टर्सचा हस्तक येड्या-बाळ्यापासून बाब्या मयेकर, शार्पशूटर विज्या ऊर्फ पेट्यासह सुर्या मंचेकर पुढे लॉरिन्स बिष्णोईचा शेरा मलिक, श्यामलाल पुनिया पाठोपाठ आता पंजाबमधील जग्गू पुरिया टोळीचा खतरनाक गुंड दीपक राठी… अशा एक ना अनेक नामचिन गुंडांचं इथं खुलेआम वास्तव्य आढळले. गुन्हेगारी वर्तुळात घातक समजल्या जाणार्या गँगस्टर्सचेही महामार्गावर छुपे अड्डे वाढू लागल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पंजाब, हरियाणा, राजस्थानासह नवी दिल्लीतील कुख्यात टोळ्यांतील गुंडांची वर्दळ वाढू लागली आहे. अन्य राज्यांतील तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्ग आश्रयासाठी सोयीचा ठरू लागल्याने कालांतराने टोळ्यांची दहशतही वाढू लागली आहे.
परप्रांतीय सराईतांचे महामार्गावरील कारनामे, स्थानिक नागरिकांसह उद्योंग- व्यावसायिकांनाही त्रासदायक ठरू लागले आहेत. स्थानिक गुंडांना (hooligan) हाताशी धरून माफियांचे वर्चस्व नजरेला येत असतानाही प्रशासन यंत्रणेच्या बेफिकीरीचा गुन्हेगारी टोळ्या आपुसक फायदा उठवित आहेत. असेच काहीसे चित्र आहे.
कुख्यात टोळ्यांचा संचार कोल्हापूरला घातक ठरणारा !
रंकाळा टॉवरसह शहरातील बहुतांशी मध्यवर्ती परिसर संवेदनशील म्हणून ओळखले जातात. धार्मिक स्थळांसह पर्यटनाच्या निमित्ताने देश- विदेशातून लोकांची गर्दी होत असते. रंकाळा टॉवर परिसर तर रात्र-दिवस गर्दीने फुललेला असतो. अशा गजबजलेल्या परिसरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचा मुक्तसंचार हा निश्चितच धोकादायक ठरणारा आहे. बिष्णोई आणि गोल्डी टोळीतील गँगस्टर शेरा मलिक पाठोपाठ पंजाबमधील कुख्यात गँगस्टर्स दिपक राठीला याच परिसरातून बेड्या ठोकल्या.
जग्गू पुरिया टोळीच्या म्होरक्याचे दहशतीचे साम्राज्य !
पंजाबमधील कुख्यात जग्गू पुरिया टोळीतील खतरनाक गुंड दिपक उर्फ अर्जुन उर्फ परवेश उर्फ ढीलो इश्वरसिंग राठी हा मुळचा हरियानातील. पंजाबसह हरियाना व नवी दिल्लीपर्यंत टोळीचे दहशतीचे साम्राज्य आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रे बाळगणे, लुटमारीसह सरकारी अधिकारी, पोलिस ठाण्यांवरील हल्ल्याप्रकरणी संशयिताविरुध्द गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. लॉरिन्स बिष्णोई टोळीशी संबंधित जनरलसिंग याची हत्या तसेच रौनितसिंगसह साथीदारावर बेछूट गोळीबारप्रकरणी पंजाब पोलिस मागावर होते. शिवाय एका खुनाच्या गुन्ह्यात राठीला 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
गोपनीय शाखा काय कामाच्या?
पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रगटीकरण (डीबी) तसेच समाज कंटकांच्या गोपनीय हालचालीवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असतानाही परप्रांतीय गुन्हेगारी टोळ्यांतील संशयितांचे कोल्हापूर कनेक्शन घातक आणि शांतता सुव्यवस्थेला बाधक ठरू शकतो. जून 2023 पासून दीपक राठीचे कोल्हापुरात वास्तव्य आहे. गोपनीय शाखांच्या यंत्रणांना त्याची खबरबात नव्हती काय?
कोल्हापूर पोलिस आणि गँगस्टर्समधील चकमकी
13 सप्टेंबर 2002 : छोटा राजन टोळीचा शार्पशूटर बाब्या मयेकरला चित्रनगरीजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषणने घातले कंठस्नान.
ऑगस्ट 2003 : मुंबईतील गँगस्टर्स सुरेश मंचेकरला मध्यवर्ती बसस्थानक पिछाडीस परीख पुलाजवळ गुंडाविरोधी पथकाने गोळ्या घालून खल्लास केले.
ऑक्टोेबर 2007 : गुरू साटम टोळीचा शार्पशूटर विजयकुमार ऊर्फ पेंटा चौधरी (टोप, ता. हातकणंगले) येथील पोलिस चकमकीत ठार : गॅगस्टर्स पेंटा काही काळ परिसरात आश्रयाला आला होता.
28 जानेवारी 2020 : महामार्गावरील किणी टोलनाका : राजस्थान येथील कुख्यात लॉरिन्स बिष्णोई टोळीचा म्होरक्या श्यामलाल पुनिया (वय 24) याच्यासह साथीदाराचा कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस पथकावर जीवघेणी हल्ला : 10 राऊंड फायर; म्होरक्यांसह तिघांना ठोकल्या बेड्या.
23 जून 2022 : लॉरिन्स बिष्णोईसह कॅनडास्थित गोल्डीबार टोळीचा साथीदार व कुख्यात गॅगस्टर मोहित ऊर्फ शेरा जगबीरसिंग मलिक (वय 30, रा. हरियाणा) याच्या रंकाळा टॉवर परिसरात आवळल्या मुसक्या.
कर्नाटकातील कुख्यात गुन्हेगार राजू सल्वराज तंगराज (रा. सिमोगा) याला कोल्हापुरात ठोकल्या बेड्या. गडहिग्लज येथील साथीदारही जेरबंद; 45 तोळे दागिने हस्तगत.
जुलै 2022 : जयपूर (राजस्थान) येथील गुंड विक्रम गुर्जर ऊर्फ पपल्या याला राजस्थान येथील कमांडोज पथकाने सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे छापा टाकून महिलेसह जेरबंद : गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड दहशत असलेल्या गँगस्टर्सचे कोल्हापुरात काही काळ वास्तव्य होते.