इचलकरंजीत लिगाडे मळा परिसरात युवकांचा धुडगूस

(crime news) जवाहरनगरमधील लिगाडे मळा परिसरात अनोळखी युवकांनी धुडगूस घालत तब्बल 10 चारचाकी वाहनांचे दगड घालून नुकसान केले. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मुलाच्या वाहनाचाही समावेश आहे. भागातील शुद्ध पेयजल प्रकल्पाचीही मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. यामध्ये दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेमुळे या परिसरात दहशत मोठी निर्माण झाली होती.

जवाहरनगर परिसरातील लिगाडे मळा येथे काही युवकांनी मध्यरात्री दहशत माजवली. पहिल्यांदा लिगाडे मळा येथे कॉर्नरवरील रस्त्यालगत असलेल्या माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या काचा दगड मारून फोडल्या. तसेच आतील यंत्रसामुग्रीवरही दगड घातले. त्यानंतर त्या युवकांनी प्रकल्पालगत असलेल्या बोळात शिरत धुडगूस घातला. हाळवणकर गल्लीतील वाहने लक्ष्य केली. यामध्ये वाहनांवर मोठमोठे दगड टाकत काचा फोडल्या. त्यामध्ये दोन मालवाहतूक टेम्पो, एक ह्युंदाई, एक मारुती अल्टो, दोन मारुती कार, एक ओमनी, एक इनोव्हा आणि एक टाटा विस्टा आणि शेव्हरोलेट आदी वाहनांचा समावेश आहे. काही वाहनांच्या चोहोबाजूंनी काचा फोडत दहशत माजवण्यात आली. त्यानंतर नागरिकांची चाहूल लागताच तोडफोड करत युवकांनी तेथून पळ काढला.

याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक समीरसिंग साळवे यांनी भेट देऊन माहिती घेत तपासाच्या सूचना केल्या. मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दहशत माजविणार्‍यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली.

या घटनेची फिर्याद रोहित काशिनाथ गवळी यांनी दिली आहे. तोडफोडीत सुमारे 1 लाख 94 हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये पेयजल प्रकल्पाच्या 15 हजारांच्या नुकसानीचाही समावेश आहे. या भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (crime news)

सीसीटीव्ही बनले शोभेची वस्तू

शहरातील मुख्य मार्गावरील सीसीटीव्ही सुरू असले तरी शहरातील अंतर्गत भागातील सीसीटीव्ही बंद आहेत. लिगाडे मळा येथील वाहनांच्या नासधूस प्रकरणानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसाठी पाहणी केली असता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळून आले नाही. जवाहरनगर परिसरात वारंवार गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे या परिसरातील बंद असलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासह नवीन सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची आवश्यकता आहे.

त्या गँगचे कृत्य?

जवाहरनगर परिसरातच एका कारखान्यानजीक तिघेही संशयित पोलिसांच्या पथकाला मिळून आले. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. निव्वळ दहशत माजविण्यासाठी की अन्य कोणत्या कारणातून हे कृत्य केले याची स्पष्टता होऊ शकलेली नाही. भागात मोठी दहशत असणार्‍या आणि मोकांतर्गत कारवाई झालेल्या गँगशी या युवकांचा संबंध आहे का याची खातरजमा सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी दिली.

जवाहरनगर अशांत

जवाहरनगर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मोकासारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची येथे कायमच दहशत असते. लहान-मोठ्या घटना या परिसरात वारंवार घडतात. आजच्या घटनेमुळेही या भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह भागात अशांतता माजवणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाईची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *