आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा झोल? चाहतेही बसले डोकं धरून!

30 ऑगस्टपासून आशिया कपला ( Asia Cup ) सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी आशिया कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलवर खेळवण्यात येणार असून दोन वेगवेगळ्या देशांमध्ये याचे सामने आयोजित करण्यात आलेत. एशियन क्रिकेट काऊंसिलचे चीफ जय शहा ( Jay Shah ) यांनी ट्विट करत या वेळापत्रकाची माहिती दिली. दरम्यान यावेळी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी रंगणार आहे.

2 सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान

चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत तो भारत – पाकिस्तान ( India vs Pakistan ) हायव्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेची फायनल 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये स्पर्धेतील सामने रंगणार आहेत.

चाहत्यांना खटकली एक गोष्ट

आशिया कप 2023 ( Asia Cup ) चा पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात खेळवला जाणार आहे. पाकिस्तानच्या मुलतानमध्ये हा सामना रंगेल. आशिया कप हायब्रिड मॉडलवर खेळवला जाणार असून या स्पर्धेतील केवळ 4 सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. ग्रुप स्टेजचे 3 सामने आणि सुपर-4 मधील एक सामना पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येईल. उर्वरित सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.

दरम्यान ज्यावेळी आशिया कपचं शेड्यूल जाहीर करण्यात आलं त्यावेळी त्यामध्ये सुपर 4 मध्ये A-1, A-2 असं लिहिण्यात आलंय. आता A-1, A-2, B-1 आणि B-2 या गोष्टी क्रिकेटप्रेमींना समजलेल्या नाहीत. त्यामुळे या वेळापत्रकामध्ये झोल असल्याचं म्हटलं जातंय.

क्वालिफिकेशनचं गणित नेमकं काय?

दरम्यान सुपर 4 च्या या गोष्टी टीमच्या पात्रतेशी संबंधित आहे. A-1 म्हणजे पाकिस्तान आणि भारत A-2. श्रीलंका B-1 आणि बांगलादेश B-2 आहे. याचाच अर्थ एसीसीने आधीच स्पष्ट केलंय की, इतर संघ म्हणजे नेपाळ आणि अफगाणिस्तान पात्र झाल्याशिवाय यात बदल होणार नाही. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या टीम पात्रता फेरीत यशस्वी होतील, हे स्पष्ट होतंय.

पुन्हा भिडणार भारत पाकिस्तान

भारत पाकिस्तान सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता आगामी आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान टीम्स भिडणार आहेत. 2 सप्टेंबरला हा हायव्हेल्टेज सामना रंगणार आहे. श्रीलंकेच्या कॅंडी मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. याशिवाय जर दोन्ही टीम्स सुपर-4 साठी पात्र ठरल्या तर भारत आणि पाकिस्तान टीम पुन्हा एकदा म्हणजेच 10 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *