लग्नानंतर रितेशने पत्नीला अभिनय सोडण्यास सांगितलं? अखेर जिनिलियाने सोडलं मौन
(entertenment news) अभिनेत्री जिनिलिया डिसूझाने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. मात्र अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर ती फार क्वचित पडद्यावर झळकली. यामुळे रितेशने तिला लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करण्यापासून रोखल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर जिनिलियाने उत्तर दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जिनिलिया याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. नुकतीच ही जोडी ‘वेड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षांनंतर रितेश-जिनिलिया एकत्र झळकल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत जिनिलियाला लग्नानंतर इंडस्ट्रीपासून दूर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “लोक त्यांना जे म्हणायचं असतं ते म्हणतात पण त्यात काही तथ्य नसतं. मी स्वत:हून इंडस्ट्रीपासून दूर गेले, कारण मला माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा होता. रितेश आणि मुलांसोबत मला वेळ घालवायचं होतं. तू आणखी काम का करत नाहीस, असा सवाल मला आजही अनेकजण विचारतात. पण मला वाटत नाही की मी आणखी काम करू शकेन. मला आजही माझ्या मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला आवडतं. जेव्हा मला चित्रपटात काम करायची इच्छा होईल, तेव्हा मी स्वत:हून प्रोजेक्ट्स निवडेन.” (entertenment news)
इंडस्ट्रीत पुन्हा काम करताना कोणत्याही ठराविक बॅनरचा विचार करत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. एखादी कथा तिला खरंच आवडली आणि त्यात मनापासून काम करण्याची इच्छा निर्माण झाली तर तो प्रोजेक्ट आवडीने स्वीकारेन, असं ती पुढे म्हणाली. जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे.
जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’मध्येच तिने मुख्य भूमिका साकारली. कुटुंबाकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने याआधीच्या एका मुलाखतीतही स्पष्ट केलं होतं.
जिनिलिया लवकरच ‘ट्रायल पिरीअड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक नात्यांविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यामध्ये ती एकल मातेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जिनिलियासोबतच शक्ती कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव आणि झिदान ब्राझ यांच्या भूमिका आहेत.