नाशिकनंतर आता मिशन गोंदिया, शरद पवारांचा मोठा डाव
(political news) अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करताच शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या या दौऱ्याची पहिली सभा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये घेतली होती. त्यानंतर आता पवारांनी आपला मोर्चा अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळवला आहे.
गोंदियामध्ये येत्या 28 जुलैरोजी शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवार गटाचे कोणते नेते उपस्थित राहणार आहेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गोंदियात शरद पवार गटाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल हे करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया जिल्हाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. गोंदियामधून शरद पवार यांना कोण पाठिंबा देणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सुरुवातीला वीरेंद्र जायस्वाल यांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र ते आता पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे आले आहेत.
लवकरच जिल्हा कार्यकारिणीची घोषणा (political news)
हा प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या 28 जुलैला गोंदियामध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. याच मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, या मेळाव्यात कोणते नेते सहभागी होणार आहेत, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेश सचिव वीरेंद्र जयस्वाल यांनी दिली आहे.