राज ठाकरे यांना टाळी देणार काय?, उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

(political news) मनसे नेते राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. मनसेच्या एका नेत्याने संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे हे दोन नेते खरंच एकत्र येणार का? दोघे एकमेकांना टाळी देणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचा प्रश्न विचारला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार असल्याची चर्चा होती. त्याला काही आधार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर आधार असता तर चर्चा थांबली नसती ना…तुम्हीच सांगितलं चर्चा झाली आणि चर्चा थांबली. आता ज्यांनी कुणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधार मिळाला नसेल म्हणून चर्चा थांबली असावी, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

चर्चा नाही

राज ठाकरे यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव आला तर काय कराल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मी जर तर वर कधीच बोलत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी विचार करत नाही. मी या क्षणाचा विचार करत असतो. सध्या तरी राज ठाकरे यांच्याशी युतीची अशी कोणतीच चर्चा नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याचीही गरज नाही, असं उद्धव ठाकरे यंनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. आता महाविकास आघाडीची व्याप्ती वाढली आहे. देशात इंडिया आघाडी निर्माण झाली आहे. बंगळुरूची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाली. माझी पहिलीच भेट होती. त्यांना भेटून मला आश्चर्य वाटलं. यापूर्वी त्यांना कधीच असा भेटलो नाही. (political news)

त्यांच्याविषयीचे मला अनेक समज गैरसमज करून दिलेले होते. ते हिंदुद्वेष्टे असल्याचंही मला सांगितलं गेलं होतं. पण प्रत्यक्ष भेटल्यावर तसं काहीच नव्हतं. राहुल गांधी सर्वांना समजून घेतात. आपले मुद्दे मांडतात. इतरांचंही ऐकतात. त्यावर सर्वांसमोर मतही मांडत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं.

भाजप चुकीचा पायंडा पाडतंय

इंडिया आघाडी ही मोदी विरोधात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही आघाडी कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. ही हुकूमशाहीच्या विरोधातील आघाडी आहे. भाजप जो पायंडा पाडत आहे, तो चुकीचा आहे. त्याविरोधात आम्ही लढत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मला संपवून दाखवाच

एकेकाळी मोदी आणि अमित शाह यांना शिवसेना प्रमुखांनी वाचवलं होतं. त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? असा सवाल करतानाच मला संपवण्यात जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर संपवा, असा हल्लाच त्यांनी चढवला. आम्ही तुमच्यासोबत होतो. अकाली दलही होतं. पहिले जुने मित्र तुम्हाला का सोडून गेले? त्यांनी 36 पक्ष एकत्र केले. छत्तीसचा आकडा म्हणजे कुणाचंच कुणाशी पटत नाही. तरीही हे लोक एकत्र आले आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *