‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्याच्या अनेक भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे, पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. त्याचबरोबर वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यातही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज अति मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

त्याचबरोबर मुंबईतील नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *