‘आलमट्टी’तून दीड लाखांवर विसर्ग; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका?

आलमट्टी धरणातून गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता १ लाख ७५ हजार क्युसेकने पाण्याचा (water discharge) विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात ८९.८०० टीएमसी पाणी साठा झाला असून, आवक १ लाख ६५ हजार ८३३ क्युसेक इतकी आहे.

धरण ७२.९६ टक्के भरले आहे. विसर्ग वाढविल्यामुळे कोल्हापूर, सांगलीला तूर्तास दिलासा मिळाला आहे. बुधवारी (ता. २६) सकाळी या धरणातून फक्त १५ हजार क्युसेक विसर्ग होता. त्यानंतर सायंकाळी हा विसर्ग ७५ हजार क्युसेक करण्यात आला.

काल सकाळी ८ वाजता १ लाख २५ हजार क्युसेक इतका विसर्ग होता. तसेच धरणात १ लाख ६१ हजार ७४७ क्युसेक आवक होती. त्यानुसार दुपारी धरणातून दीड लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला. सायंकाळी यामध्ये पुन्हा वाढ करून १ लाख ७५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला.

आलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पाण्याची आवकही वाढल्याने विसर्गही (water discharge) अधिक करण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा व पाण्याच्या विसर्गावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष आहे.

येथील विसर्ग कमी केल्यास महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. यामुळे विसर्ग वाढविण्याची मागणी महाराष्ट्राकडून केली जात होती. त्यानुसार १ लाख ७५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

‘राकसकोप’चे दरवाजे दोन इंचांनी खुले

राकसकोप परिसरातही पाऊस सुरूच आहे. या जलाशयाचे दोन दरवाजे खुलेच असून, यात गुरुवारी आणखी दोन इंचानी वाढ करण्यात आली. सध्यस्थितीत दोन दरवाजे ८ इंचांनी खुले झाले आहेत. धरणाची पातळी गुरुवारी २४७४.७५ फूट इतकी होती. २८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत १२४८.१ मि.मी. पाऊस झाला आहे.

हिडकल धरणही लवकरच भरणार

हिडकल धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे गुरुवारी २९.१२६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता, तर ३०५२६ क्युसेक इतकी आवक आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ३६.४३४ टीएमसी इतका साठा होता. गतवर्षीपेक्षा अध्यापही ७ टीएमसी जलसाठा कमी आहे. मात्र, दमदार पावसाचा विचार करता हे जलाशय देखील लवकर भरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *