कळंबा जेलमध्ये गांजा नेणार्‍या सुभेदारास अटक

(crime news) कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना कारागृहाच्या सुभेदारालाच रंगेहाथ पकडले. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55, सध्या रा. आंबेडकरनगर, कळंबा, मूळ गाव चौधरीनगर, धानोळी, पुणे) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, 31 जुलैपर्यंत 4 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

बाळासाहेब गेंड हा पायातील सॉक्समधून प्लास्टिकच्या पिशवीतून सुमारे 171 ग्रॅम गांजा कारागृहात कैद्यांना पुरविण्यासाठी नेत होता. हे प्रकरण उघडकीस येताच जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, सुमारे 2 किलो 300 ग्रॅम गांजा व रोख 50 हजार रुपये मिळाले. कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून गांजा सापडणे, मोबाईल, सिम कार्ड सापडणे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रत्येकाची अंगझडती घेऊनच कारागृहात सोडले जाते.

गुरुवारी सकाळी आठ वाजता सुभेदार बाळासाहेब गेंडची ड्युटी होती. तो मुख्य प्रवेशद्वारातून आत जात होता. शिपाई महेश देवकाते हे त्याची अंगझडती घेत होते. झडती घेताना देवकाते यांना बाळासाहेब गेंडचा संशय आला. त्यांनी त्याला बूट आणि सॉक्स काढायला सांगितले. त्यावेळी त्याच्या सॉक्समध्ये प्लास्टिक पिशवी असल्याचे दिसले. त्यांनी ती पिशवी ताब्यात घेत बाळासाहेबला बाजूला थांबण्यास सांगितले. तपासणी केली असता पिशवीत गांजा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्याच्यावर तातडीने पोलिस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.(crime news)

गुन्हा दाखल होताच जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव, पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी, संदीप पाटील आदींसह अधिकारी कर्मचार्‍यांनी गेंड याच्या घराची झडती घेतली असता 2 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख 50 हजार रुपये आढळून आले. कारवाईत सापडलेल्या गांजाची किंमत अंदाजे 25 हजार रुपये इतकी होते. पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *