सांगली : बनावटगिरीचा रानबाजार; भेसळीचा गोरखधंदा फार्मात
एकीकडे रासायनिक खतांच्या (fertilizers) किमती शेतकर्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. मात्र या मुलखाच्या महाग खतांत अपवाद वगळता बगॅस, थर्मलची राख, खाणमातीची सर्रास भेसळ करून ती शेतकर्यांच्या माथी मारण्याचा भेसळीचा गोरखधंदा फार्मात आहे. यातून शेतकर्यांची आर्थिक लूट तर होत आहे. तर निकृष्ट खतांतील धोकादायक भेसळीमुळे शेतजमिनींचीदेखील हानी होऊ लागली आहे. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा जास्त हवे, त्यात मात्र 0.2 टक्याच्या वर वाढ होऊ शकलेली नाही. सामू 8.5 च्या वर हवा तो 7.0 च्या आसपास आहे. हा सारा परिणाम हा भेसळयुक्त खतांमुळेच होत असल्याचे जाणकारांतून सांगण्यात येते.
दि. 10 मे 2021 रोजी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली. महागड्या दरामुळे खतांचा वापर हा शेतकर्यांसाठी चैनच ठरला. मात्र याचवेळी खतांमध्ये भेसळीच्या प्रमाणात वाढ होत आहे. हे भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी विभाग अजिबात आक्रमक दिसत नाही. उन्हाळी शेतीमशागतींचा हंगाम आणि आता खरीप! या पार्श्वभूमीवर अपवाद वगळता भेसळीचा गोरखधंदा फुल्ल फार्मात आहे. दुधातील, साखरेतील, खव्यात भेसळ सर्वमान्य झाली आहे. मात्र खतांमध्येही भेसळ होऊ शकते हेच अनेक शेतकर्यांना अजून लक्षात येत नाही.
अशी ओळखा खतातील भेसळ
सिंगल सुपर फॉस्फेट 16 टक्के (एस. एस. पी) : 1 ग्रॅ्रम खतात 10 मि. लि. पाणी टाकून हलवावे, यात एस. एस. पी. विरघळतो; मात्र काही न विरघळणारे पदार्थ तरंगल्यास खत कमी प्रतीचे असल्याचे स्पष्ट होते.
म्युरेट ऑफ पोटॅश 60 टक्के (एम. ओ. पी) : हे खत जळणार्या ज्योतीवर टाकल्यास ज्योतीचा रंग पिवळा होतो. युरियाप्रमाणे यात गारवा जाणवतो.
कॅल्शियम अमोनियम नायट्रेट 25 टक्के नत्र (सी.ए.एन) : हे खत परीक्षण नलिकेत घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिड टाकले असता बुडबुडे येतात.
कोणतेही खत (fertilizers) मग त्याचा रंग कोणताही असो तो कधी आपल्या हाताला लागत नाही जर रंग हाताला लागला असेल तर ते खत भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक पाहता रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात येतात. मात्र केवळ नत्र वगळता इतर खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण भेसळयुक्त खतांमुळे महाग दराने खते घेऊन देखील त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. याचा शेतकर्यांना दुहेरी फटका बसत आहे. अनेकवेळा कीडनाशकेही निकृष्ट दर्जाची येताहेत.
जमिनीची उत्पादकता घटली
मुळात सातत्याने एक आणि एकच पीक घेत राहिल्याने शेतजमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली आहे. खते, बियाणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनदेखील उत्पादन अनेकवेळा वाढत नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा जास्त हवे, त्यात मात्र 0.2 टक्याच्या वर वाढ होऊ शकलेली नाही. सामू 8.5 च्या वर हवा तो 7.0 च्या आसपास आहे. हा सारा परिणाम हा भेसळयुक्त खतांमुळेच होत आहे.
ज्या खतांच्या माध्यमातून निविष्ठा वापरल्या जाताहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत. निकृष्ट व कमी दर्जाची अनेक रासायनिक, जैविक खते उपलब्ध आहेत, त्यातून भेसळ करून शेतकर्यांची फसवणूक करण्यात येत आहे. खतांमध्ये सर्रात साखर कारखान्याची बगॅस, थर्मलची राख, खाणीतील माती मिसळून नानाविध ब्रँडची खते हजार ते दीड हजार रुपयाला पन्नास किलोप्रमाणे विकली जातात. निकृष्ट दर्जाची शंभर-दोनशे रुपयांची खते तर हजार बाराशेंना सहजच विकली जात आहेत. यातून जमिनीला पुरेसे अन्नघटक मिळत नाहीतच; शिवाय शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.