ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष; तीन तासांहून अधिक काळ तणावाचे वातावरण
छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाच्या गणेशमूर्ती स्थापनेवरून सुरू असलेल्या दोन गटांच्या वादात (dispute) शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष उफाळून आला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठापना केलेल्या 21 फुटी गणेशमूर्तीच्या मंडपातच दुसरी गणेशमूर्ती बसविण्याचा पवित्रा ठाकरे गटाने घेतला. बिंदू चौकातून गुरुवारी दुपारी उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. तीन तासांहून अधिक काळ तणावाचे वातावरण होते. अखेर काही अंतरावर दुसरा मंडप उभारून या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
एकवीस फुटी गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेवरून छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळात दोन गटांत वाद सुरू आहे. चौकातील मूळ जागेवर मूर्ती बसविण्याचा दावा दोन्ही बाजूने करण्यात आला होता. यामध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट, असा संघर्ष निर्माण झाला आहे.
पोलिसांसमोर समझोता
मंडळातील वाद (dispute) मिटविण्यासाठी पोलिसांनी एकत्रित बैठक घेऊन दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना गणेशमूर्ती बसविण्यास मनाई केली होती. 19 सप्टेंबरला सायंकाळी मंडप उतरविण्याचे कामही सुरू होते. अशातच मध्यरात्री येथे 21 फुटी गणेशमूर्ती आणण्यात आली. यानंतर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी पालखीतून गणेशमूर्ती आणून याच मंडपात बसविण्याचा निर्धार बोलून दाखवला होता.
बिंदू चौकाला पोलिस छावणीचे
स्वरूप; ठाकरे गटाचा ठिय्या
ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह कार्यकर्ते पालखीतून गणेशमूर्ती घेऊन शिवाजी चौकाकडे मार्गस्थ झाले. याठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा होता. पोलिसांनी शिवाजी रोडवर या गटाला थांबविण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाने रस्त्यावर ठिय्या मारला. बिंदू चौक, शिवाजी चौक परिसरातला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
शिवाजी रोडवर तीन तास शुकशुकाट
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने शिवाजी रोड वाहतुकीस बंद करण्यात आला. दुपारी 12.30 पासून 3 वाजेपर्यंत या रस्त्यावर एकही वाहन सोडण्यात आले नाही. कार्यकर्ते रस्त्यावर बसून होते. काही वेळाने पोलिसांनी पालखी एका बाजूला घेऊन कार्यकर्त्यांना सावलीत थांबण्याची विनंती केली.
छत्रपती शिवाजी चौकात दुसरा गट
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, कपिल केसरकर, शिवाजी जाधव यांच्यासह कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित जमले होते. ठाकरे गटाच्यावतीने आणलेल्या गणेशमूर्तीची विटंबना होऊ नये यासाठी या मंडपाशेजारी दुसरा मंडप उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी भूमिका क्षीरसागर यांनी मांडली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी बोलून यावर तोडगा काढण्यात आला.
दुपारी चार वाजता गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
ठाकरे गटाच्या वतीने आणलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना शिवाजी मार्केट प्रवेशद्वाराजवळ मंडप उभारून करण्यात आली. दुपारी 12 वाजता बिंदू चौकातून मार्गस्थ झालेली श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना होण्यास तब्बल चार तासांचा कालावधी लोटला.
मंडळाची स्थापना व मूळ वाद
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मूळ रिक्षा मित्र मंडळाच्या नावाने 2000 साली सर्वप्रथम एकवीस फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना संयुक्त शिवाजी चौक मित्र मंडळ नावाने केली होती. यानंतर काही काळाने मंडळात वाद निर्माण झाल्याने तत्कालीन पदाधिकारी राजू नागवेकर यांनी डिसेंबर 2015 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर संबंधित मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी दिली नसल्याचे व पब्लिक ट्रस्ट रेकॉर्डनुसार नोंद नसल्याचे समोर आले. न्यायालयाने कोणताही निकाल दिला नव्हता. अशातच पुन्हा मंडळात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेवरून वाद विकोपाला गेला आहे.