कोल्हापुर जिल्ह्यात होणार तीन नवी पोलिस ठाणी

शहरांचा वाढता विस्तार आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता राज्यात नवीन 29 पोलिस ठाणी (Police station) अस्तित्वात येणार आहेत. ठाणे, नवी मुंबईसह पालघर, पुणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत नवीन पोलिस ठाणी कार्यान्वित होण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे विचाराधीन आहे. लवकरच याबाबत निर्णय होऊन मंजुरी दिली जाणार आहे. यामध्ये कोल्हापुरात तीन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण, जीवनमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप, सोशल मीडियाचा समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार व वाढता वापर व त्या माध्यमातून होणारे धार्मिक-राजकीय गुन्हे, त्यांचे समाजात उमटणारे पडसाद, इंटरनेटच्या माध्यमातून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यामुळे गुन्ह्यांत होणारी वाढ लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस महासंचालकांनी गृह विभागाकडे राज्यात नवीन 29 पोलिस ठाणी कार्यान्वित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.

राज्यात सद्य:स्थितीत 1107 पोलिस ठाणी (Police station) आहेत. पोलिस शिपायापासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत सुमारे 2 लाख 43 हजारांच्या जवळपास संख्याबळ आहे. परंतु वाढत्या शहरीकरणाबरोबरच वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि नवीन पोलिस ठाणे निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून पुणे शहर (3), ठाणे शहर (2), छत्रपती संभाजीनगर, नागपूर शहर (2), सोलापूर शहर, नवी मुंबई, पालघर (2), पुणे ग्रामीण (2), अहमदनगर (3), जळगाव, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला ग्रामीण, वाशिम, कोल्हापूर, जालना, बीड, नागपूर ग्रामीण (3) येथे नवीन पोलिस ठाण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्यातील एकूणच पोलिस ठाण्यांचा आढावा घेऊन नवीन पोलिस ठाण्यांचा विचार केला जाणार आहे. यामध्ये आणखी नव्या पोलिस ठाण्यांची भर पडून ही संख्या 50 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *