पन्हाळा मुख्य रस्ता पुन्हा धोकादायक
पन्हाळा मुख्य रस्त्यावरील दगडी शिळा (landslide) आज (सोमवार) कोसळली. गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने आज मुख्य रस्त्यावर काही दगड मुख्य रस्त्यावर कोसळले. सकाळी लहान दगड पडत होते, मात्र थोड्या वेळानंतर आणखी दोन ते तीन मोठे दगड पडल्याने हा रस्ता पुन्हा धोकादायक होत असल्याची चर्चा सुरू झाली.
दोन-तीन वर्षांपूर्वी पन्हाळा मुख्य रस्त्यावर दरड कोसळली होती. पूर्ण रस्ता तुटून गेला होता. या नंतर रस्त्याचे पाच कोटी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले आहे. त्याच्या खाली मुख्य रस्त्यावरच आज दरड कोसळली. वारंवार दरड कोसळू लागल्याने पन्हाळा रस्ता पुन्हा धोकादायक झाल्याचे दिसत आहे.
या दरडी बांधण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा, अथवा पन्हाळगडासाठी पर्यायी रस्ता कायमस्वरूपी बांधला जावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (पीडब्ल्यूडी) सार्वजनिक बांधकाम विभाग व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतल्यास वरिष्ठ कार्यालयाला कोसळलेल्या दरडीबाबत सूचना देण्यात आल्याचे समजते. दरम्यान रस्त्यावर दरडी कोसळत (landslide) असल्याने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी सावधानता बाळगूनच वाहने चालवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाच्या हद्दीत हा रस्ता येत असून, या रस्त्याचे वन विभाग सर्व्हेक्षण करणार आहे. या बाबतीत वरीष्ठांना कळवले आहे, अशी माहिती वनरक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
वाघबीळ व बुधवार पेठ येथे बॅरिगेट्स लावून आणि एक वाहतूक मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पेठ ते पन्हाळा वाहतूक काहीवेळ बंद करण्यात आली होती, त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.