“….तर याला संघटना जबाबदार राहणार नाही;” राजू शेट्टी यांनी दिला इशारा
‘गेल्यावर्षीच्या उसाच्या (Sugarcane Rate) प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून (ता. ३) साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर (Sugar Factory) जाऊ देणार नाही. एखादा ट्रक, टेम्पो कार्यकर्त्यांनी अडवला तर याला संघटना जबाबदार राहणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपये मिळावेत या मागणीसह यंदाच्या गळीत हंगामातील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारपासून (ता. १७) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर ‘आत्मक्लेश यात्रा’ काढली जाणार आहे.
१७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अशी २२ दिवस यात्रा काढून जयसिंगपूर येथे याच दिवशी २२ वी ऊस परिषद घेतली जाणार आहे. साखर कारखान्यांना ४०० रुपये देणे सहज शक्य आहे. स्वाभिमानीची मागणी चुकीची आहे असे म्हणता येत नाही. तरीही, साखर कारखाने हा दर देणार नसतील आणि सरकार याला पाठीशी घालत असतील तर ‘आत्मक्लेश’ केल्याशिवाय पर्याय नाही.’
शेट्टी पुढे म्हणाले, जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील. गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर ढोल बजावून त्यांना जागा करण्याचे काम केले आहे. उद्यापासून उग्र आंदोलन केले जाणार आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर प्रतिक्विंटल दर (Sugarcane Rate) ३३०० रुपये होता. सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा कारखान्यांना ५०० रुपये दर मिळाले आहेत. ते शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्ड्यांवार, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.
अशी होणार आत्मक्लेश यात्रा
दत्त कारखाना, गुरुदत्त कारखाना, जवाहर कारखाना, शाहू कारखाना, हमीदवाडा कारखाना, संताजी घोरपडे कारखाना, बिद्री कारखाना, आसुर्ले-पोर्ले, वारणा कारखाना यामार्गे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांवर आंदोलन केले जाईल.