मराठा समाज आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी जेल भरो

मराठा समाजाला आरक्षण (reservation) देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी मिरजकर तिकटी येथे जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी होण्याचा निर्धार सोमवारी सकल मराठा समाजाने केला.

पापाची तिकटी येथे मराठा आरक्षणाबाबत सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बाबा इंदुलकर म्हणाले, राज्य सरकारकडून मराठा समाजाची बाजू कोर्टात कशी आणि किती मांडली जाते याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मराठा समाजाला मिळणारे आरक्षण हे न्यायालयीन पातळीवर टिकणे महत्त्वाचे आहे. मराठा समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज आहे. यापुढे केवळ स्त्यावरची नाही तर कायद्याची लढाई लढावी लागणार आहे.

यावेळी दुर्वास कदम यांनी मराठा समाजाने अन्य समाजाला उभा करण्यामध्ये आपले योगदान दिले आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व जातीच्या घटकांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले.

रवि इंगवले म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (reservation) रत्यावर उतरून आंदोलन करत आहे. पण सरकार आपल्या सोयीनुसार आंदोलकांना आश्वासन देत आहे. पण त्याची पूर्तता करत नाही. राज्य सरकारमध्ये अनेक सरकार मराठा समाजाचे आहेत पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केंद्र सरकारने अध्यादेश काढल्यास मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मिटणार आहे. पण सरकराची मानसिकता तयार करण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज आहे.

अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी समाजातील विविध असोसिएशनचे पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याची सूचना मांडली. वैशाली महाडिक यांनीही पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे सांगितले.

शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, शासनाला जाग आणण्यासाठी येत्या 10 ऑक्टोबरला मिरजकर तिकटी येथे सकाळी साडेअकरा वाजता जेल भरो आंदोलन करण्यात येईल. यासाठी शहरातील प्रत्येक भागात जाऊन आंदोलनाची माहिती दिली जाईल. या आंदोलनात मराठा समाज व अन्य समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी हेाण्याचे आवाहन केले.

यावेळी दिलीप देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, बाबा पार्टे, सचिन चव्हाण, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएनशनचे अध्यक्ष प्रशांत देसाई, किशोर घाटगे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *