‘गोकुळ’ कार्यालयासमोर निषेधार्थ निदर्शने
गायीच्या दूध खरेदी दरात कपात (deduction) केल्याच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या वतीने मंगळवारी ताराबाई पार्क येथील ‘गोकुळ’च्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डोंगळे यांनी याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.
‘गोकुळ’ने गाय दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात केल्याबद्दल गाय दूध उत्पादकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या दर कपातीच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील दूध उत्पादकांनी ‘गोकुळ’कडे आपला मोर्चा वळवला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दूध उत्पादक गोकुळ कार्यालयासमोर जमा झाले. याठिकाणी दर कपातीच्या (deduction) निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. निवेदन स्वीकारण्यासाठी ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आंदोलकांसमोर आले. परंतु, आंदोलकांनी आम्ही अध्यक्षांशी चर्चा करणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सर्व आंदोलकांना हॉलमध्ये बोलाविण्यात आले. अध्यक्ष डोंगळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील उपस्थित होते.
यावर डोंगळे म्हणाले, गायीच्या दुधाची आवक प्रचंड वाढली आहे. दूध पावडरचे दरही घसरले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागत आहे. असे असले तरी दराव्यतिरिक्त दूध उत्पादकांना सव्वा रुपये फरकापोटी दिले जातात. त्यामुळे अन्य संघांपेक्षा ‘गोकुळ’चा दर अधिकच आहे. आपल्या मागण्यांबाबत संचालक मंडळात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. शिष्टमंडळात करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पुंडलिक कारंडे, आनंदा दिंडे, संदीप पाटील, शिवाजी पाटील आदींचा समावेश होता.