89 ग्रा.पं.साठी नोव्हेंबरला ‘या’ दिवशी होणार मतदान
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (election) रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतींसह राज्यातील दोन हजार 359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि 3 हजार 80 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सहा सरपंचपदांसह 72 रिक्त जागांसाठी याच दिवशी मतदान होणार आहे. निवडणूक होत असलेल्या गावात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया होणार आहे. रिक्त जागांसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 16 ऑक्टोबर रोजी प्रारंभ होणार आहे. दि. 20 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी छाननी होईल. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर चिन्हवाटप होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून 6 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्याने जिल्हा प्रशासनानेही निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाला सुरुवात केली आहे.
जून ते डिसेंबरअखेर मुदत संपणार्या जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (election) होत आहेत. यामध्ये गारगोटी, सरवडे, कसबा वाळवे, बाजार भोगाव, वाशी, चिंचवाड आदी महत्त्वांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकांसह थेट सरपंच पदाच्या सहा रिक्त जागांसह 48 ग्रामपंचायतीच्या 72 जागांसाठी पोटनिवडणूकही होणार आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील सर्वाधिक 21 रिक्त जागांचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील 17, करवीर तालुक्यातील 8 रिक्त जागांचा समावेश आहे.
सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीत राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे राजकीय नेत्यांनी गटांच्या माध्यमातून गावावरील सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.